Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बेळगावातील काळा दिन - कर्नाटक राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची कसून तपासणी

बेळगाव शहर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप


बेळगाव (प्रतिनिधी):
 उद्या 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव दिन व काळा दिन पार्श्वभूमीवर कर्नाटक- महाराष्ट्र सीमा भागातील वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. बेळगाव शहर परिसरात बंदोबस्तामुळे पोलीस छावणीचेे स्वरूप आले आहे.  बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह बहुलभाषिक सीमाभाग अन्यायकारक पद्धतीने कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यात आला. याचा निषेध म्हूणन म. ए. समितीच्या वतीने दि.1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सवा दिवशी सन 1956 पासून काळा दिन पाळण्यात येतो.  महाराष्ट्रात जाण्यासाठी असलेली सीमा भागातील तमाम मराठी भाषिकांची तळमळ, निष्ठा व एकजूट पाहायला मिळते. 

उद्या 1 नोव्हेंबर कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर कन्नड संघटनांनी बेळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी लाल- पिवळे ध्वज, शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. दरम्यान उद्या शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून राज्योत्सव दिनाच्या मिरवणुकीला प्रारंभ होणार असून लाल- पिवळे ध्वज घेऊन कन्नड रक्षण विदिकेचे कार्यकर्ते रॅली काढण्याच्या तयारीत आहेत.तर दुसरीकडे कोरोना नंतर दोन वर्षांनी पूर्वीप्रमाणेच बहुसंख्येने एकत्र येत काळ्या दिनाची मूक सायकल फेरी यशस्वी करून काहीही झाले तरी महाराष्ट्रात जाणारच असा निर्धार करून म. ए. समिती, सीमाभाग शिवसेना आणि तमाम मराठी भाषिकांनी दंड थोपटले आहेत.

कर्नाटक राज्योत्सव व म. ए. समितीचा काळा दिन दोन्ही शांततेत पार पडावे यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर तसेच चौकांमध्ये बंदोबस्तासाठी 2500 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. शहरात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडींवर 8 ड्रोन कॅमेरे, 300 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

 पोलिसांकडून सीमाभागात वाहनांची चौकशी 

बेळगाव शहरात उद्या काळ्या दिनानिमित्त विविध मोर्चे व निदर्शने सायकल रॅली आदीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकल रॅलीला व मराठी भाषिकांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातून शिवसैनिक बेळगावला येत असतात. या शिवसैनिकांना कर्नाटकात प्रवेश बंदी करून त्यांना परत पाठवण्यासाठी दूधगंगा नदी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या दूधगंगा नदीजवळ पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला असून महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहनांवर पोलीस बारीक नजर ठेवून आहेत. तर दुसरीकडे चंदगड तालुक्याच्या हद्दीजवळ शिनोळीनजीक बाची येथेही चेक पोस्ट उभारण्यात आले असून महाराष्ट्रातून कर्नाटकात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली जात आहे.

 वैयक्तिक कामासाठी येणाऱ्यांना त्रास दिला जाणार नाही 

महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटक राज्यात न येण्याचा इशारा देण्यात आला असून वैयक्तिक काम आणि व्यवसायानिमित्त कर्नाटकात येणाऱ्यांना कोणत्याही प्रकारे त्रास दिला जाणार नाही अशी माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.