Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

साखर कारखाना सुरू करण्याच्या तयारीला लागा : आमदार मुश्रीफ

गडहिंग्लज येथील सत्कार व आभार मेळाव्यात नवनिर्वाचित संचालकांना आमदार मुश्रीफ यांचे आवाहन

"कोणत्याही परिस्थितीत साखर कारखान्याला आर्थिक अरिष्ठातून बाहेर काढू"

"कारखान्याला जिल्हा बँकेचे आर्थिक पाठबळ उभे करू"

"साखर कारखान्याचा विस्तार करून स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील"  


गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
शेतकरी सभासदांनी साखर कारखान्यावर एकहाती सत्ता देऊन आपल्या सर्वांवर फार मोठी जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे हे आमचे आता कर्तव्य आहे. त्यामुळे नूतन संचालकांनी आता विलंब न करता गडहिंग्लज साखर कारखाना सुरू करण्याच्या तयारीला लागावे असे आवाहन माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथे आयोजित आभार मेळाव्यात नूतन कारखाना संचालकांना केले.

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना निवडणुकीत विजय झालेल्या छत्रपती शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या नवनिर्वाचित 19 संचालकांचा सत्कार समारंभ व आभार मेळावा गडहिंग्लज येथील लक्ष्मी चौकात पार पडला. यावेळी आमदार मुश्रीफ  बोलत होते. या मेळाव्यास डॉ. प्रकाश शहापूरकर, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, प्रकाशराव चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर, संग्रामसिंह कुपेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक प्रचारादरम्यान विरोधकांकडून वैयक्तिक पातळीवर जाऊन आमच्या पॅनलच्या उमेदवारांवर टीका टिपणी करण्यात आली. या टीकांकडे सर्वांनी दुर्लक्ष करावे व आपले काम करत रहावे. टीकेला उत्तर न देता आपण डॉ. शहापूरकर यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखाना कसा सुरू करणार आहोत, कारखाना सभासद व कामगारांच्या हितासाठी काय करणार आहोत हे सांगावे असे मी सर्व उमेदवारांना सुचवले होते. या टीकेला योग्य वेळी आपण उत्तर देऊया असे सर्वांना सांगितले होते. त्यामुळे लक्ष्मी चौकातील आजच्या सभेत विजयी उमेदवारांनी विरोधकांनी त्यांच्यावर केलेल्या टीकेवर पाचच मिनिटात योग्य उत्तरे विरोधकांना दिली आहेत. येत्या आठवडाभरात कारखाना चेअरमन, व्हाईस चेअरमन पदाची निवड केली जाईल. मात्र या निवडीची वाट न पाहता सर्व नूतन संचालकांनी साखर कारखाना सुरू करण्याच्या तयारीला लागावे. शासकीय पातळीवर कोणत्या परवानग्या घ्याव्या लागतील याबाबत तज्ञांशी चर्चा करा, कारखान्याची सद्यस्थिती काय आहे याची माहिती घ्या. असे आवाहन त्यांनी नूतन संचालकांना केले. सध्या कारखान्याचा मेंटेनन्स झालेला नाही, बॉयलरची दुरुस्तीही झालेली नाही याकडे देखील आमदार मुश्रीफ यांनी लक्ष वेधले. यापूर्वी 12 संचालक प्रशासकांना भेटून कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी नोटीस काढा, निविदा काढा हे सातत्याने सांगत होते. मात्र मध्ये  सरकारच्या अदलाबदलमुळे गेले  अनेक दिवस शासनाची परवानगी मिळाली नाही. मिळाली मात्र तीही वेळाने. त्यानंतर निविदा काढण्यात आली मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. आता गळीत हंगाम सुरू होऊन महिना झाला आहे. त्यामुळे कारखाना तातडीने सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली करणे अपेक्षित आहे. त्यामुळे नूतन संचालकांनी कारखान्याची स्थिती काय आहे, अवधी किती लागणार आहे, ऊसतोड टोळ्या किती मिळणार आहेत, कारखाना चालू करण्यासाठी किती दिवस लागणार आहे, हंगाम किती दिवस मिळणार आहे याचा अंदाज नूतन संचालकांनी विना विलंब घ्यावा असे आवाहन देखील मुश्रीफ यांनी यावेळी केले.

आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, जिल्हा बँकेच्या माध्यमातून आजरा साखर कारखान्याला एक न्याय व गडहिंग्लज साखर कारखान्याला एक न्याय दिला जात आहे अशी टीका माझ्यावर होत होती. मात्र वस्तुस्थिती वेगळी होती. त्याचं स्पष्टीकरणही मी केलो होतो. आजरा साखर कारखाना हा 'एनपीए'त गेला होता. 80 कोटी एनपीएची रक्कम भरल्यानंतर त्यांना पुन्हा कर्ज देणे शक्य झाले होते. त्यामुळे रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे त्यांना कर्ज देण्यात आले. त्यामुळे आजरा साखर कारखाना गेल्यावर्षी सुरु झाला. हा त्यांचा आता दुसरा गळीत हंगाम सुरू आहे. मात्र गडहिंग्लज साखर कारखान्याची वस्तुस्थिती वेगळी आहे. हा कारखाना उणे नेटवर्थमध्ये आहे. या कारखान्याची  सर्व मालमत्ता जरी विकली तरी देणे अजून शिल्लक राहते अशी परिस्थिती सध्या कारखान्याची आहे. मागील संचालकांनी जिल्हा बँकेला कर्जासाठी पोस्टाने प्रस्ताव पाठविला होता. कोणीही मला अथवा बँकेच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटले नाहीत. या प्रस्तावातील त्रुटी मी त्यांना पाठवल्या होत्या मात्र याचे उत्तर अजूनही आलेले नाही. खरोखरच त्यांना बँकेची गरज होती काय, की त्यांना कारखाना चालवायचा नव्हता? असा सवाल देखील आमदार मुश्रीफ यांनी यावेळी केला. कारखाना तयारीसाठी नऊ ते दहा महिन्याचा कालावधी त्यांना का लागला, ते कशाच्या शोधात होते?  असा प्रश्न करत त्यांनी कसलीही तयारी केली नाही याची मला खंत वाटते असे सांगत नाराजी व्यक्त केली.

साखर कारखानदारी अडचणीत

सद्यस्थितीतील साखर कारखानदारी बाबत बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, अजूनही साखर कारखानदारी अडचणीतच आहे. एका टनामागे चारशे रुपयेचा तोटा सोसावा लागत आहे. यावर्षी साखरेचे दर चांगले असूनही टनाला दोन ते अडीच कोटी तोटा आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. कारखान्यांनी घेतलेल्या कर्जाचे व्याज, बेसुमार नोकर भरती, त्यांचा पगार व होणारा व्याज यामुळे कारखाने अडचणीत आहेत. ज्या कारखान्याचे डिस्टलरी, को जनरेशन, इथेनॉल प्रकल्पासह विस्तारीकरण झाले आहे ते कारखाने मात्र सध्या फायद्यात आहेत असे सांगितले. त्यामुळे गडहिंग्लज साखर कारखाना सुरू करण्यामागे कितीही अडचणी असल्या तरी या परिस्थितीवर मार्ग काढला जाईल. जिल्हा बँकेच्या माध्यमातून  कारखान्याला आर्थिक पाठबळ उभे केले जाईल असे आश्वासन आमदार मुश्रीफ यांनी देत कारखाना उर्जित अवस्थेत आणला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.                    

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व कारखान्याचे नूतन संचालक सतीश पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर, प्रकाशराव चव्हाण, डॉ. प्रकाश शहापूरकर, संग्रामसिंह कुपेकर, रमेश रिंगणे  आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांचे आभार रामगोंडा पाटील यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.