बेळगाव (प्रतिनिधी): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कर्नाटक राज्यात आजपासून कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. शाळा-महाविद्यालयात मास्क सक्तीचा असणार आहे. सुर्वणसौधमध्ये आज दुपारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.
कोविडच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर विधानसौधमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर महसूल मंत्री आर. अशोक यांनी प्रसारमाध्यमांना निर्णयांची माहिती दिली. कोविडची नवी लाट चीनमध्ये आणि इतर देशांमध्ये कोविड वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर अधिक लक्ष ठेवले जात आहे. संभाव्य गरज लक्षात घेऊन बंगळुर, मंगळुरू विशेष इस्पितळे राखीव ठेवण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी खासकरून शाळा-कॉलेज वर्गात, सिनेमा थिएटरमध्ये मास्क, सॅनिटायझर अनिवार्य केले आहे. हॉटेल, बार, पबमध्ये ग्राहक, पुरवठादार या सगळ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. जेवढे टेबल आणि खुर्च्या आहेत तेवढ्याच ग्राहकांना परवानगी आहे. असे आर. अशोक यांनी स्पष्ट केले.

