Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बेळगावात मराठी भाषिकांची गळचेपी सुरूच

ऐनवेळी म. ए. समितीच्या महामेळाव्याला नाकारली परवानगी

महामेळावा ठिकाणचा मंडप व इतर साहित्य हटविले 

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना ताब्यात घेतल्याने संताप 


बेळगाव (प्रतिनिधी):
बेळगावात दबाव तंत्राचा वापर करत पोलिस प्रशासनाने यंदाही समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे,  माजी महापौर शिवाजी सुंठकर, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, मोतेश बारदेस्कर, अमोल देसाई  यांच्यासह नेत्यांना ताब्यात घेतले आहे. आज महामेळावा परिसरात १४४ कलम लागू केले आहे.

बेळगावात कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी  महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने दरवर्षी मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात येते. मात्र शहरातील कायदा सुव्यवस्था आबाधित राखणे यासह इतर  कारणे देत महामेळाव्याला परवानगी नाकारून मराठी भाषिकांच्या एकीची वज्रमूठ कमकुवत करण्याचा केविलवाणा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येतो.

यंदाही  प्रशासनाने नेहमीचाच कित्ता गिरवला असून शेवटच्या क्षणी महामेळाव्याला परवानगी नाकारून मराठी भाषकांची गळचेपी केली आहे. आज सकाळपासूनच महामेळाव्याच्या ठिकाणी व्हॅक्सिन डेपो परिसरात उभारण्यात आलेला मंडप आणि इतर साहित्य हटविण्यात आले.

 व्हिडिओ पहा 👇

बेळगाव शहरात, सीमा भागातील चेक पोस्टवर कडेकोट पोलीस बंदोबस्त'

म. ए. समिती महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच बेळगाव शहरातील प्रमुख तसेच व्हॅक्सिन डेपोकडे जाणाऱ्या मार्गांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून पोलीस प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करताना दिसत आहेत. याशिवाय महाराष्ट्र - कर्नाटक राज्याच्या सीमेवरील बाची येथे उभारण्यात आलेल्या चेक पोस्टवरही मोठा पोलीस हॉस्पिटल तैनात करण्यात आला आहे. येथेही महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनावर पोलिसांची करडी नजर आहे.

 माजी जि.पं.सदस्या सरस्वती पाटील यांची प्रतिक्रिया 👇

व्हॅक्सिन डेपो परिसरात १४४ कलम  

कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी  आयोजित केलेल्या महामेळाव्याला टिळकवाडी पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचे कारण देत परवानगी नाकारली. यावेळी  कर्नाटक राज्य अतिरिक्त पोलीस महासंचालक  (कायदा व सुव्यवस्था) अलोककुमार यांनी महामेळाव्याच्या ठिकाणी  व्हॅक्सिन डेपो परिसराला भेट देऊन पाहणी केली. तसेच मेळाव्यासाठी आणलेले साहित्य व उभारण्यात आलेला मंडपही त्यांनी हटविण्यात सांगितला. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, दरवर्षी कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व्हॅक्सिन डेपो परिसरात महामेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदाही  समितीने महामेळावा आयोजित केला होता. मात्र समितीच्या महामेळाव्यामुळे शहरात तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच कर्नाटक विधानसभेचे बेळगाव सुवर्ण विधानसौध  येथे होत असलेले  हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडावे या पार्श्वभूमीवर  महामेळाव्याला परवानगी नाकारण्यात आली आहे. व्हॅक्सिन डेपो परिसरात १४४ कलम व जमाबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. असे असताना मराठी भाषिकांनी कायद्याचे उल्लंघन करून  व्हॅक्सिन डेपो  किंवा शहरातील अन्य भागात  मेळावा घेण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

म. ए. समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाही : पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी  

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याची धास्ती घेतलेले पोलीस प्रशासन सकाळपासूनच व्हॅक्सिन डेपो परिसरात ठाण मांडून होते. महामेळाव्याच्या  ठिकाणी कोणत्याही मराठी भाषिकांनी प्रवेश करू नये यासाठी पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी जातीनिशी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, म. ए. समितीने टिळकवाडी पोलिसांकडे महामेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. तसे पत्रही त्यांनी सादर केले होते. मात्र परिस्थितीचा विचार करता शहरात कायदा सुव्यवस्था तसेच महामेळाव्यामुळे शहरातील शांततेचा भंग होऊ नये या दृष्टिकोनातून टिळकवाडी पोलिसांकडून शेवटच्या क्षणापर्यंत महामेळाव्याला परवानगी देण्यात आली नव्हती. असे असतानाही व्हॅक्सिन डेपो परिसरात समितीकडून महामेळाव्यासाठी तयारी सुरू करण्यात आली. ही परिस्थिती पाहता परिसरात १४४ कलम लागू करून महामेळाव्यासाठी येथे आणण्यात आलेले साहित्य ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्नाटक राज्य अतिरिक्त पोलीस महासंचालक अलोककुमार 👇




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.