आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध
कोल्हापूर : कर्नाटक पोलिसांकडून आमदारावरच हल्ला होत असेल तर मग बेळगावातील मराठी भाषिकांवर किती अन्याय, अत्याचार होत असतील असा संतप्त सवाल करत माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला.
बेळगाव येथे आज महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला जाण्याचा निर्धार कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. या महामेळाव्याला जाण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते शांततेने बेळगावच्या दिशेने जात असताना कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक पोलिसांकडून या नेत्यांना व कार्यकर्त्यांना आडविण्यात आले. दडपशाहीचा अवलंब करण्यात आला. यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ यांनी कर्नाटक सरकारच्या या दडपशाहीचा निषेध केला. कर्नाटक पोलिसांकडून आमच्यावर लाठीहल्ला झाल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. ते म्हणाले, शांततेच्या मार्गाने जात असताना देखील कर्नाटक पोलिसांकडून एका लोकप्रतिनिधीवरच लाठीहल्ला होत असेल तर मग बेळगावातील मराठी भाषिकांवर किती अन्याय व अत्याचार होत असतील याचा विचार होणे आवश्यक आहे. असे सांगून कर्नाटक सरकारच्या या दंडूकेशाहीचा त्यांनी जाहीर निषेध नोंदविला.

