ठाकरे गट शिवसेनेचे गडहिंग्लज पोलीस ठाण्याला निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): ३१ डिसेंबर रोजी किल्ले सामानगड व काळभैरी डोंगरावर पोलीसगस्त वाढवण्याची मागणी ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्याच्या नावाखाली जेवणावळीसह ओली पार्टी केली जाते. गडहिंग्लज पासून काही अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले किल्ले सामानगड आहे. तसेच गडहिंग्लजसह सीमा भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले काळभैरी मंदिर डोंगर परिसर आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिकामी जागा व जंगल भाग असल्याने येथे ओली पार्टी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वी किल्ले सामानगड येथे ओली पार्टी करण्याचे प्रकार घडले होते. मात्र शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी असे प्रकार उधळून लावत गडाचे पावित्र्य जपले आहे.
३१ डिसेंबरला ओल्या पार्ट्यांसह जेवणावळी सामानगडसह काळभैरी डोंगर परिसरात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस गस्त वाढविल्यास अशा चुकीच्या प्रकारांना आळा बसेल व असे प्रकार आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
या निवेदनावर शिवसेना उपशहर प्रमुख काशिनाथ गडकरी, संदीप कुराडे, अक्षय नावलगी, विभाग प्रमुख दिगंबर पाटील, शाखाप्रमुख गजानन आरदाळकर, युवा सेनेचे शकील मुल्ला, गजानन पाटील आदींच्या सह्या आहेत.

