गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज नगरपरिषद शिक्षण मंडळ मार्फत घेण्यात आलेल्या आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत शिवराज स्कूलने २-० असा शिवाजी विद्यालयाचा पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या स्पर्धा म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता.
पूर्वार्धात दोन्हीही संघानी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. छत्रपती शिवाजी विद्यालयाकडून वेदांत धुंदरे, ऋतुराज आडसुळे यांनी गोल नोंदविण्यासाठी चढाया सुरू केल्या. शिवराजकडून अरिंजेय हातरोटे, फराण नदाफ, साहिल शेख यांनी या चढाया परतवून लावल्या. पूर्वार्धाच्या शेवटी शिवराजकडून अरमान मिराच्या पासवर रणवीर कुराडेने हेड मारून गोल नोंदवत एक गोलची आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात शिवराजकडून धैर्यशील वाघ याने मारलेला जोरदार फटका शिवाजी विद्यालयाच्या गोल रक्षकाने उत्कृष्टरित्या आडविला. आलोक पाटील याने उत्कृष्ट गोल नोंदवत शिवराज संघाला २-० असा विजय मिळवून दिला.
या विजयामध्ये कर्णधार अरिंजय हातरोटे, शुभम कांबळे, अरमान यळकुद्रे, अलोक पाटील, सामीन मणेर, अरमान मिरा,अक्षय राठोड, साहिल शेख, सुमित पाटील, श्रेयश पावले, धैर्यशील वाघ, गणेश चव्हाण, अभिषेक राठोड, फराण नदाफ, रणवीर कुराडे, प्रशिक्षक किरण कावणेकर यांचे योगदान आहे. सामन्यासाठी पंच म्हणून यासीन नदाफ, सिद्धार्थ दड्डीकर, सुरज हानीमनाळे, सुरज कोंडुसकर यांनी काम पाहिले.

