Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

संकेश्वर- आंबोली- बांदा महामार्गाबाबत स्पष्टता द्यावी

गडहिंग्लज, आजऱ्यातील बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


गडहिंग्लज (प्रतिनिधी):
संकेश्वर- आंबोली- बांदा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू झाले आहे. पूर्वी हा मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. या पार्श्वभूमीवर महामार्गाबाबत लेखी खुलासा व स्पष्टता देण्यात यावी अशी मागणी गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. 

सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा किती रुंदीचा होता व आहे, भूसंपादन कधी व किती रुंदीने झाले, गडहिंग्लज व आजरा तालुक्यातील या रस्त्याच्या लगतचे खातेदार, शेतकरी हे प्रामुख्याने अत्यल्प  भूधारक आहेत त्यामुळे सदर जमीन भुमिअभिलेख खात्याकडून मोजणी करून रुंदी बाबत खात्री करून रस्ता करावा, सदर रस्त्यावरून गडहिंग्लज  तालुक्यातील हिटणी नाका ते आजरा तालुक्यातील घाटकरवाडीपर्यंत ५८ कि.मी अंतर असून या रस्त्यावर गडहिंग्लज शहर व आजरा शहरासह २८ गावे येतात. हा रस्ता काही गावातील वस्तीतूनही जाणार आहे. त्यामुळे शेकडो कुटुंबे, घरे, शेतघरे, दुकान गाळे बाधित होणार आहेत. याबाबत  काय नियोजन केले आहे याचा खुलासा व्हावा, गडहिंग्लज व आजरा शहरातून हा रस्ता जाणार आहे असे कळते त्यामुळे त्याला दुभाजक, वाहनतळाची व्यवस्था आहे का, तसेच शहरात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ असणार आहेत की नाही याचीही माहिती मिळावी, घाटकरवाडी ते हटणी नाका या रस्त्यावरील शेकडो वर्षांपूर्वीच्या झाडांची कत्तल झालेली आहे. प्रथम दर्शनी पाहता आवश्यकतेपेक्षा जास्त झाडांची तोड झाली असून याची चौकशी व्हावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

या राष्ट्रीय महामार्गाला आमचा विरोध नाही परंतु वरील मुद्द्यांबाबत खुलासा होऊन मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व इतर संघटनांकडून प्रांत कार्यालयावर विविध आंदोलने करण्यात आली आहेत. दोन्ही तालुक्यातील शेतकरी व नागरिक, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, प्रांत अधिकारी यांच्यासोबत संयुक्त बैठकाही झालेल्या आहेत, मात्रराष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून समाधानकारक खुलासा झाला झालेला नाही असे निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर, तम्माना पाटील, अण्णासो पाटील दुंडगे, बजरंग चव्हाण, हणमंत कानडे, वसंत जाधव, सुधाकर जाधव आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.