प्राचार्य डॉ.सुरेश चव्हाण यांचे मत
गजरगाव येथे राजा शिवछत्रपती महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात व्याख्यान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजच्या तरुणाईला मोबाईल, व्यसनापासून दूर राहण्यासाठी श्रमसंस्कार शिबिरांची गरज असल्याचे मत कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश चव्हाण यांनी व्यक्त केले.
गजरगाव येथे राजा शिवछत्रपती महाविद्यालयाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरात प्रबोधनात्मक व्याख्यानात बोलत होते. प्रमुख प्रमुख पाहुणे सुरेश पोवार होते.अध्यक्षस्थानी बापू चव्हाण होते.
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. चव्हाण पुढे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये प्रकाश टाकताना मानवाने ७५ वर्षात भौतिक प्रगती केली. मात्र आरोग्य, नैतिक मूल्ये, शिक्षण यामध्ये अवमूल्यन झालेली आहे. महापुरुषांच्या स्वप्नातील भविष्यातील भारत घडवायचा असेल तर विद्यार्थी, युवक व सुजाण नागरिकांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. तरच आपला देश महासत्ता बनेल. आजच्या तरुणाईने मोबाईल, व्यसन, यापासून दूर राहणे गरजेचे आहे. यासाठी अशा श्रमसंस्कार शिबिरांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक प्रा.दिलीप काळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. मानाजीराव शिंदे यांनी करून दिला. यावेळी ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रा. गजानन कुलकर्णी यांनी मानले.


