Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पंचमहाभूत लोकोत्सव : सर्व समावेशक लोककल्याणाचा विश्वव्यापी सोहळा

सात दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवाचे नेमके स्वरूप कसे असणार आहे वाचा सविस्तर माहिती....


कणेरी येथील सिद्धगिरी मठाच्या पुढाकाराने परमपूज्य श्री. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली  दिनांक २० ते २६ फेब्रुवारी दरम्यान कणेरी मठ  (कोल्हापूर) येथे होत असलेला "सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव" हा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थी, शेतकरी, महिला, युवा वर्ग, उद्योजक, साधुसंत, महंत, शास्त्रज्ञ, शिक्षक अशा विविध घटकांनी सर्व समावेशक असा हा विश्वव्यापी सोहळा असणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या लोकोत्सवात पंचमहाभूतांबाबत जागृती, प्रबोधन केले जाणार आहे. हा लोकोत्सव नेमका कसा साजरा होणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहूयात...

कणेरी मठावर २०१५ साली परमपूज्य श्री काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली असाच एक कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमाला जवळपास वीस लाख लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. मात्र आता होणारा सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव हा यापेक्षाही कैकपटीने मोठा असणार आहे. या लोकोत्सवाला देशभरातील प्रत्येक राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर व लोक, विदेशातील पाहुणे येणार आहेत. जवळजवळ तीस ते पस्तीस लाख लोक येण्याची शक्यता आहे. या लोकोत्सवात विद्यार्थ्यांची संख्या अधिक असणार आहे. हा विश्वव्यापी कार्यक्रम असल्याने याची तयारी जोरात सुरु आहे. सिद्धगिरी मठाने पुढाकार घेऊन करत असलेल्या या लोककल्याणाच्या कार्यासाठी राज्य शासनानेही पुढाकार घेतला आहे. कार्यक्रमस्थळी रस्ते, पाणी, विज यासह विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ही कामे देखील युद्ध पातळीवर होत आहेत. त्याबरोबरच अधिकाऱ्यांना, शिक्षकांना, सर्व गावांच्या सरपंचांना या लोकोत्सवाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची सूचनाही शासनाने दिल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यसह देशभरात याची जागृती सुरू आहे. 

या लोकोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच दिनांक १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीचे औचित्य साधून कोल्हापुरातील दसरा चौक ते पंचगंगा घाटापर्यंत भव्य शोभायात्रा आयोजित केली जाणार आहे. ही शोभायात्रा पंचमहाभूतांच्या तत्वांना अनुसरूनच संपन्न होणार आहे. या शोभायात्रेदरम्यान कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. या लोकोत्सवाचे उदघाटन दिनांक २० फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्या पाठोपाठच जवळपास आठ ते दहा राज्यांचे मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. विविध देशांचे राजदूत यासह विदेशी नागरिकांची या लोकोत्सवाला मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभणार आहे. यावेळी लोकोत्सवात मांडण्यात आलेल्या विविध गॅलरींचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

दिनांक २१ फेब्रुवारी रोजी आकाश तत्वावर कार्यक्रम होईल. या कार्यक्रमात विद्यार्थी व युवा वर्ग, वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर यांचा सहभाग असणार आहे.

२२ फेब्रुवारी रोजी वायु तत्वावर कार्यक्रम होणार आहे. यामध्ये  जवळपास दहा हजारांवर उद्योजक उपस्थित राहणार आहेत. प्रामुख्याने उद्योजक वर्गाचा यामध्ये सहभाग असणार आहे.

दिनांक २३ फेब्रुवारी रोजी अग्नि तत्त्वावर कार्यक्रम होईल. यामध्ये हजारो  साधू, संत, महंत यांचा सहभाग असणार आहे. त्याच दिवशी दुसऱ्या व्यासपीठावर देशभरातील पाचशेहून अधिक कुलगुरू, विदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन सत्र पार पडणार आहे.

दिनांक २४ फेब्रुवारी रोजी जल तत्त्वावर आधारित कार्यक्रम होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांचा सहभाग लक्षणीय असणार आहे. त्याचबरोबर त्याच दिवशी जवळपास पाच हजाराहून अधिक पारंपारिक वैद्यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन सत्र होईल. यामध्ये पर्यावरण, आरोग्य यासंबंधी मार्गदर्शन तसेच चिंतन व मंथन केले जाणार आहे.

दिनांक २५ फेब्रुवारी रोजी पृथ्वी तत्वावर आधारित कार्यक्रम होणार आहे. पृथ्वी तत्व हे मातीशी निगडित असल्याने यामध्ये प्रामुख्याने शेतकरी वर्गाचा सहभाग असणार आहे. याच दिवशी सायंकाळी शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या कालावधीत दररोज सकाळी दहा ते दुपारी एक व सायंकाळी चार ते साडेसहा या वेळेत विविध मार्गदर्शन सत्रे पार पडणार आहेत. दिनांक २६ फेब्रुवारी या लोकोत्सवाचा समारोप होणार आहे.

विविध जनावरे, पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन 

दिनांक २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान विविध जनावरे, पाळीव प्राण्यांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. यामध्ये गायी, म्हशी, बैल, घोडे, गाढव, देशी मांजर, कुत्रे, शेळी आदींचा समावेश असणार आहे. हे प्रदर्शन शेतकरी वर्गासह विविध घटकालाही मार्गदर्शक ठरणार आहे.

विविध सांस्कृतिक कार्यक्रम

दिनांक २१ पासून सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम दररोज होणार आहेत. यामध्ये देशभरातील कलाकारांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध देशातील सांस्कृतिक कलेचे दर्शन होणार आहे.


कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर अधिक गडद होणार

लोकोत्सव ज्या पंचमहाभूतांवर आधारित आहे त्या पंचतत्वाचे पाच कुंभ आकार घेत आहेत. शिल्पकार विविध प्रकारची शिल्प घडविण्यात गर्क आहेत. शेती विभाग व कृषी विज्ञान विभाग जमिनीचा पोत कमी न होता विविध पिके कशी घेता येतात हे प्रत्यक्षात लोकांना दाखवण्यासाठी, पिकांच्या वाढीसाठी बारकाईने काळजी घेत आहेत. शेतीपूरक व्यवसायही प्रदर्शन आणि विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहे. या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रत्येकाची भूक भागविण्यासाठी  खाद्य पदार्थ बनविण्यासाठी वस्तूंची जमवाजमव सुरू झाली आहे. या लोकोत्सवामुळे कणेरी मठाचे पर्यायाने कोल्हापूरचे नाव जगाच्या नकाशावर अधिक गडद होणार आहे म्हणून व्यवस्थापन समिती अहोरात्र झटत आहे. इतक्या लोकांची व्यवस्था करण्यासाठी स्थानिकांचा या कार्यक्रमात सहभाग वाढविण्यासाठी व्यवस्थापन समिती गावागावात सुमंगलम् पंचमहाभूत लोकप्रसार सभा घेत आहे. या कार्यक्रमासाठी शासकीय यंत्रणेकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. या संपूर्ण तयारीसाठी अदृश्य काडसिध्देश्वर स्वामीजी, व्यवस्थापन समितीला मार्गदर्शन करत आहेत. व्यवस्थापन समितीचे प्रमुख शंकर पाटील व डॉ. संदीप पाटील समिती सदस्यांना मार्गदर्शन करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.