Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस

दिव्यांगांना साहित्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते वाटप


ठाणे :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच किसन नगर येथील मुलांना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते खाऊ व वह्या वाटप करण्यात आल्या. तसेच टेंभीनाका येथील कार्यक्रमात दिव्यांगांना विविध साहित्यांचे वाटप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

स्वयम् दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या वतीने ठाण्यातील स्व. गंगूबाई संभाजी शिंदे बहुउद्देशीय सभागृहात दिव्यांग रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांच्या रोजगारासाठी उपयुक्त अशा स्वयम् अॅपचे अनावरण, स्वयम् च्या ‘झेप’ या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे अनावरणही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वयम् अॅपच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगार संधीची माहिती मिळणार आहे. यावेळी दिव्यांगांसाठी भरविण्यात आलेल्या विशेष प्रदर्शनाची पाहणीही मुख्यमंत्री महोदयांनी केली. यावेळी स्वयम् च्या संस्थापक डॉ. नीता देवळालकर उपस्थित होत्या.

नागरिकांच्या शुभेच्छांचा केला स्वीकार

मुख्यमंत्र्यांनी आनंद आश्रमात आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांच्या शुभेच्छांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वीकार केला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना दप्तर व क्रिकेट किटचे वाटप करण्यात आले.

दिव्यांगांना साहित्याचे वाटप

डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने टेंभी नाका येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना तीन चाकी सायकल, कुबड्या, कानाचे मशीन, व्हीलचेअर या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्यदूत पुस्तिकेचे प्रकाशनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या शुभेच्छा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे येथील निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना वाढदिवसाच्या व आरोग्यदायी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.