गडहिंग्लज (प्रतिनिधी): महावितरण कंपनीच्या प्रस्तावित ३७ टक्के वीज दरवाढीला गडहिंग्लजमधून हरकत नोंदवत विरोध करण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, वीज वितरण कंपनीने केलेल्या प्रस्तावित ३७ टक्के दर वाढीवर आयोगाने हरकती मागविलेल्या आहेत. त्यानुसार या ३७ टक्के दरवाढीला आम्ही हरकत घेत आहोत. वीज मंडळामध्ये खर्च वाढला, करात दर वाढ, तोटा झाला ही अकार्यक्षमता, वीज चोऱ्या आणि भ्रष्टाचार यांना मान्यता व प्रोत्साहन देणारी कार्यपध्दती आता बंद केली पाहिजे. स्पर्धा कार्यक्षमता, प्रामाणिकपणा आणि इच्छाशक्ती या आधारावर एकूण खर्चावर कठोर नियंयत्रण आणने आवश्यक आहे. दुदैवाने ही इच्छाशक्ती विज कंपनीकडे कधीच नव्हती व नाही. याचा अनुभव ग्राहकांना गेली २३ वर्षे येत आहे.
महावितरण कंपनीने सुमारे ३७ टक्के वीज दरवाढीची मागणी केलेली आहे. महावितरणच्या याचिकेमध्ये आगामी दोन वर्षामध्ये ६७ हजार ४४४ कोटी रुपये तुट भरपाईची मागणी केली आहे. एकूण दोन वर्षाचा हिशोब करता ही मागणी म्हणजे दरवाढ रु.२.५५ रुपये प्रति युनिट म्हणजे सरासरी ३७ टक्के दरवाढीची आहे. ही प्रचंड मागणी आयोग स्थापन झाल्यापासून गेल्या २३ वर्षात प्रथमच करण्यात आली आहे. देशात महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दर असूनही इतकी प्रचंड मागणी राज्यातील सर्वसामान्य ग्राहकांना शॉक देणारी आहे. या प्रस्तावित वीज दरवाढीमुळे महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या उद्योगांना रोखणारी व असलेल्या उद्योगांना राज्याबाहेर घालवणारी आहे. देशातील अन्य राज्यातील वीजदर विचारात घेतले तर महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक पातळीवर आहे. त्यात आणखी भर पडल्यास त्याचे राज्यव्यापी प्रचंड परिणाम होणार आहेत. आणि शेवटी वीज वापरणारा ग्राहक हा या व्यवस्थेमध्ये बळीचा बकरा होणार आहे. यासाठी राज्य सरकारने राज्याच्या हिताच्या दृष्टीने त्वरित हस्तक्षेप करावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली असून याबाबत योग्य तो निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदनावर सिद्धार्थ बन्ने, सुरेशराव कोळकी, माजी नगरसेविका रेश्मा कांबळे, माजी नगरसेवक हारूण सय्यद, रमजान अत्तार, अमर मांगले, अवधूत रोटे, उदय परीट, संतोष कांबळे, संजय बाडकर, रश्मीराज देसाई, महेश गाडवी, तुषार येमगेकर, अण्णासाहेब देवगोंडा आदींच्या सह्या आहेत.

