गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत 'स्पर्धा परीक्षेचे बदलते स्वरूप' या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विभाग प्रमुख प्रा.एम.बी.ईकिले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.डी.पी.खेडकर यांनी केले. स्पर्धा परीक्षेचे तज्ञ मार्गदर्शक प्रा.जॉर्ज क्रुझ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्या स्पर्धा परीक्षेशिवाय तरणोपाय नाही. विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु करण्यापूर्वी या परीक्षेचे स्वरूप काय आहे. या स्पर्धा परीक्षेमध्ये कोण-कोणत्या विषयाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. या परीक्षेसाठी आपण काय करणे गरजेचे आहे. हे पहिल्यांदा समजून घेणे आवश्यक आहे.
स्पर्धा परीक्षा ही एकमेव गोष्ट अशी आहे कि, ज्याव्दारे खऱ्या अर्थाने माणूस घडतो. आयुष्यात या क्षेत्रात करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करणे गरजेचे आहे. आपण आयुष्यात काय बनायचे ते अगोदर ठरवा आणि त्यादृष्टीने करण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आयुष्यात वेळेला महत्व देण्याबरोबरच वास्तव स्वीकारणे आवश्यक आहे. आतापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणे महत्वाचे आहे तरच तुम्ही या क्षेत्रातून यशस्वी व्हाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्वत:चे विचार व कृती बदला आपण जीवनात यशस्वी होतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नव्या परीक्षा पध्दतीत जे बदल करण्यात आले आहेत याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या अभ्यासामध्ये लेखन कौशल्य, भारताचे शासन व राजकारण, विज्ञान व अर्थशास्त्र तसेच नीतिशास्त्र याचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. सक्षम अधिकारी व्हावा यासाठी या अभ्यासाला प्राधान्य देण्यात आल्याचे जॉर्ज क्रुझ यांनी सांगितले. त्यासाठी विद्यार्थ्यांनी रोज चार तास अभ्यास करावा, बदललेल्या अभ्यासक्रमाला सामोरे जाण्यासाठी केवळ वाचन गरजेचे नाही तर त्याचे आकलन करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दुपारच्या सत्रात प्रेमकुमार नाईक यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत उपाध्यक्ष अॅड. दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस या अग्रणी योजने अंतर्गत चंदगड, आजरा व गडहिंग्लज या भागातील विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी- विद्यार्थिनी सहभागी झाले होते. या कार्यशाळेतील सर्व सहभागींना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यशाळेचे समन्वयक प्रा.अशोक मोरमारे यांनी आभार मानले .





