चंदगड : चंदगड तालुक्यात राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत तालुक्यातील सर्व ग्रा.पं. पदाधिकारी यांची कार्यशाळा सुरु झाली आहे. १४ मार्च पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत तालुक्यातील सर्व गावांचा समावेश असणार आहे. उदघाटन विस्ताराधिकारी एस.एन. ठोबरे व बी.एस.कांबळे यांचे हस्ते करण्यात आले.
शासनाच्या शाश्वत विकासाची 17 उद्दिष्टे व 9 संकल्पना यावर आधारित कार्यशाळा घेतली जात आहे. कार्यशाळेसाठी तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी कर्मचारी, आशा, ग्रा.पं.सदस्य, ग्रा.पं कडील डाटा ऑपरेटर यांना हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. किमान 22 ते 24 गावांच्या प्रशिक्षणार्थी यांना यामध्ये प्रशिक्षण देण्यात येईल. तीन बॅचमध्ये तालुक्यातील सर्व गावांतील प्रशिक्षणार्थी यांना प्रशिक्षण देण्यात येईल.
गटविकास अधिकारी सी. ए. बोडरे, बी. एस्. कांबळे, तानाजी सावंत, डी. के. किल्लेदार, दीपक कांबळे, वैभव पाटील, प्रसाद गंगवाले, सुमित पाटील व सहाय्यक गटविकास अधिकारी यांनी कार्यशाळेचे चांगले नियोजन केले आहे. विस्तार अधिकारी व इतर अधिकारी यांनी आपापली जबाबदारी पार पाडली.
कार्यशाळा घेण्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमार्फत ट्रेनिंग घेतलेले प्रवीण प्रशिक्षक कार्यशाळा घेत आहेत. यामध्ये शिवाजी गुरव, विलास ओवळकर, माधुरी सावंत- भोसले, काशिनाथ मोरे हे काम पार पाडत आहेत.
नऊ संकल्पना वर सखोल माहिती दिली जात आहे. यामध्ये गरीबी मुक्त आणि उपजीविका वृद्धीस पोषक गाव, आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ आणि हरित गाव , पायाभूत सुविधा असलेले स्वयंपूर्ण गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव या विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली. प्रवीण प्रशिक्षकांच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्याची भावना प्रशिक्षणार्थी व्यक्त करत आहेत.
2 मार्च रोजी कार्यशाळा सुरू झाली असून 14 मार्चपर्यंत चालणाऱ्या या कार्यशाळेसाठी तालुक्यातील सर्व गावातील प्रशिक्षणार्थीनी वेळापत्रकानुसार उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समिती मार्फत करण्यात आले आहे.




