गडहिंग्लज (प्रतिनिधी): 'शिवराज'चा काव्यकट्टा कार्यक्रम प्रमुख पाहुणे माजी विद्यार्थी कवी श्रावण मोटे, रेखा पोतदार व शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड .दिग्विजय कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते.
प्रज्ञा परिसर प्रकल्प अंतर्गत ग्रंथालय आणि वाडमय मंडळ, समाजशाखा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवराज काव्यकट्टा कार्यक्रम मान्यवर कवी आणि नवोदित कवींच्या काव्याने अधिकच बहरला. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक डॉ. आनंदा कुंभार यांनी केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्रशासकीय सेवकांनी अहुजा इलेक्ट्रिक डायस भेट दिल्याबद्दल रजिस्ट्रार संतोष शहापूरकर व रामा वडर यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला. सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
माजी विद्यार्थी कवी श्रावण मोटे यांनी उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार म्हणजे कविता होय, मोबाईलच्या या जमान्यात मोबाईल ही मैत्रिणीसारखी आहे. केंव्हा धोका देईल हे सांगता येणे कठीण झाले असल्याचे सांगून सद्या प्रेमकवितांचा सर्वत्र भडीमार होतो आहे. अशी ही तरुणाई ऑनलाईन मेसेज माझा कधी वाचेल याकडे डोळे लावून बसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हे विदारक चित्र त्यांनी आपल्या 'ऑनलाईन कुणासाठी कुणीतरी' या कवितेतून सादर केली. 'बापाचं लेकीस पत्र' या कवितेतून 'कसे सरले दिवस काही कळलेच नाही'.. आता त्या बालपणात डोकावसं वाटतं.. खरंच लेकी तुझ्याशी थोडं बोलावसं वाटतं.. या काव्यातून बाप आणि मुलीच्या नात्यांमधील हळव्या बापाचे मन व्यक्त झाले आहे. त्यांच्या 'श्रावणधारा' या कवितेतून ऊन पावसाच्या सरी जसा लपंडाव चाले....आठवणींचा सडा, माझ्या अंगणात फुले.. ही कविता सर्वच विद्यार्थ्यांना मोहरून गेली.
माजी विद्यार्थीनी कवी रेखा पोतदार यांनी आपल्या 'सखा' या कवितेतून आयुष्य उलगडताना, चढ-उतार उन्हा -पावसाळ्याची .....पाप-पुण्याचा पाढा वाचताना, तूच साक्षीदार तूच पदो-पदी..... या कवितेतून आपल्या मैत्रीचा उलगडा निखळपणे मांडून 'कर्मकहाणी अरुणाची'....... या कवितेतून ४२ वर्ष विकलांग जीवनात गोठलेल्या मनाची दर्दभरी कहाणी किती करूण होती याचे चित्रण कवी रेखा पोतदार यांनी सादर केले. यावेळी त्यांनी 'न्याय' ही कविता सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमात फार्मसीचे ग्रंथपाल शिवाजी शिंदे, वैष्णवी पाडले, अनिल कलकुटकी, स्नेहल सकट, स्नेहल येजरे, अंकिता जोंधळे, ऐश्वर्या तराळ, सोनाली कदम, निशांत कलगोंडा, ऋतुजा कुलकर्णी, दुर्वांकुर डोमणे, अक्षता रजपूत, गीता पाटील, मुकुंद परिट, सानिया शेख, निमेश देवार्डे, शुभम मेंगाणे, निवृत्ती तिगोटे, कोमल चोथे, शफिया देसाई, प्रियंका खवरे, शुभेच्छा माने यासह अन्य नवोदित कवींनी आपल्या व नामवंत कवींच्या कविता सादर केल्या.
या कार्यक्रमास ग्रंथपाल संदीप कुराडे, प्रा. पौर्णिमा कुराडे यांच्यासह विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.पी. हेंडगे यांनी केले. आभार प्रा. डी.यू.जाधव यांनी मानले.




