आमदार सतीश जारकीहोळी यांचे वैशिष्ट्य
पहिल्याच टप्प्यात मंत्रिमंडळात स्थान
जारकीहोळी बंधूंचा बेळगाव जिल्ह्यातील आठ मतदारसंघात प्रभाव
बेळगाव : बेंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमवर कर्नाटकचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी आज दु.१२. ३० वा. शपथ घेतली. तसेच आठ आमदारांनाही मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील यमकनमर्डी मतदार संघातून विजयी झालेले आमदार सतीश जारकीहोळी यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. आ. सतीश जारकीहोळी यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे पण त्यांची राजकारणावर पकड आहे. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाल्मिकी समाज असून या समाजाची मते मिळविण्यात सतीश जारकीहोळींना यश आले. बेंगळूर येथे वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी बैठक घेऊन सतीश जारकीहोळींना काँग्रेस पक्षाने चांगले पद द्यावे अशी मागणी केली होती. त्यामुळे सतीश जारकीहोळींना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
सतीश जारकीहोळी दोन वेळा निजदकडून विधान परिषदेवर निवडून गेले. २००६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००८ पासून यमकनमर्डी मतदारसंघातून सलग चौथ्यांदा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
आ. सतीश जारकीहोळी यांचे राहणीमान अत्यंत साधे आहे पण त्यांची राजकारणावर चांगली पकड आहे. आत्ताच्या निवडणुकीत चौथ्यांदा निवडून आल्याने त्यांची महत्त्वाच्या मंत्रिपदावर नियुक्ती निश्चित मानली जात होती.
बेळगाव जिल्ह्यातील आठ मतदारसंघात प्रभाव
जारकीहोळी बंधूंचा बेळगाव जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे. गोकाक, यमकनमर्डी, अरभावी या मतदारसंघांसोबत बेळगाव ग्रामीण, अथणी, कागवाड, निपाणी या मतदारसंघांवरही त्यांचा प्रभाव आहे.

