Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'माझी वसुंधरा अभियान'मध्ये गडहिंग्लज नगरपरिषद राज्यात प्रथम

'भूमी थिमॅटिक' मधील अतिउत्कृष्ट कामगिरीबद्दलही विशेष प्रमाणपत्र


पालिकेला एकूण ५.५ कोटीचे बक्षीस प्राप्त


समस्त गडहिंग्लजकरांसाठी आनंदाचा क्षण 



मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना गडहिंग्लज नगरपरिषदेचे मुख्याधिकारी स्वरूप खारगे व पालिकेचे इतर अधिकारी वर्ग. 



गडहिंग्लज (प्रतिनिधी): माझी वसुंधरा अभियान 3.0 च्या स्पर्धेत गडहिंग्लज नगरपरिषदेने २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तसेच भूमी थिमॅटिक भागात केलेल्या अतिउत्कृष्ट कामगिरीबद्दल देखील विशेष प्रमाणपत्र देऊन पालिकेचा गौरव करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पर्यावरण सचिव प्रवीण दराडे यांचे हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मुख्याधिकारी स्वरूप खारगे, पाणीपुरवठा अभियंता अनिल गंदमवाड, रविनंदन जाधव, निखिल पाटील, ओमकार बजागे यांनी स्वीकारला. पालिकेला एकूण ५.५ कोटीचे बक्षीस प्राप्त झाले आहे. पालिकेच्या यशाने गडहिंग्लज शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.  




महाराष्ट्र शासनाकडील पर्यावरण विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान ३.० राबविणेत येत आहे. सदर अभियानामध्ये पर्यावरणाशी निगडीत भूमी, वायु, जल, अग्नि व आकाश इत्यादी बाबींवर काम करणे आवश्‍यक आहे. गडहिंग्लज नगरपरिषदेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुध्दा माझी वसुंधरा अभियान ३.० मध्ये सहभाग घेतला आहे. सदर अभियान अंतर्गत गडहिंग्लज नगरपरिषद मार्फत विविध उपाययोजना तसेच उपक्रम राबविणेत आले आहेत. शहरात विविध ठिकाणी अनेक प्रकारच्या देशी रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले असून नर्सरी तयार करण्यात आली आहे. लावलेल्या झांडाची नगरपरिषदमार्फत दैनंदिन देखभाल करण्यात येते. यामुळे शहरात सध्या अंदाजे ६० हजारापेक्षा अधिक वृक्षांची संख्या आहे. यामुळे शहरात ३३ टक्के पेक्षा जास्त हरीत अच्छादन निर्माण झाले आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत १०० टक्के कचरा संकलन, वाहतुक आणि प्रक्रिया करणेत येत आहे. नगरपरिषद मार्फत ओल्या कचऱ्यापासून तयार करण्यात आलेल्या खतास महाराष्ट्र शासनाचा हरीत ब्रँड प्राप्त झाला आहे. खताची विक्री करण्यात येत असून त्यापासून नगरपरिषदेस उत्पन्न मिळत आहे.


 बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी 👇🏼




शहरात शंभर टक्के प्लास्टिक बंदी 


शहरात १०० टक्‍के प्लास्टीक बंदी लागू असून शहरातीलसर्व मिळकत धारकांना कापडी पिशवी वाटप करण्यात आले आहे. तसेच नगरपरिषद कार्यालयात कापडी पिशवी वेंडीग मशीन बसविण्यात आले असून याद्वारे ५ रुपयात प्लास्टीक पिशवी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शहरातील वैद्यकीय कचरा व ई-कचरा यांचे व्यवस्थापन योग्य प्रकारे करण्यात येत आहे. हागणदारी मुक्‍त अभियानामध्ये शहरास 00.4 दर्जा प्राप्त झाला आहे.



शहरात वायु गुणवत्ता मोजमाप संयंत्र


शहरातील वायू गुणवत्तेबाबत वायू गुणवत्ता मोजमाप संयंत्र बसविण्यात आले आहे. सध्या शहराची वायु गुणवत्ता स्थिती उत्तम दर्जाची आहे. शहरात विविध ठिकाणी सायकल ट्रॅक तयार करण्यात आले आहे. तसेच विद्युत वाहनांकरिता नागरिकांसाठी शहरात एकूण ४ ठिकाणी मोफत चार्जिंग स्टेशन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. नगरपरिषद मार्फत 5 च्या माध्यमातून ई-रिक्षा खरेदी करण्यात आली असून त्याचा वापर करण्यात येत आहे. नगरपरिषद मार्फत विविध ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टींग यंत्रणा तसेच शोष खड्डे तयार करण्यात आले असून याद्वारे पाण्याची बचत करण्यात येत आहे. शहरातील सर्व नळ ग्राहकांनी पाण्याचे मीटर बसविल्याने पाण्याचा वापर योग्य प्रकारे होत आहे. नगरपरिषद मार्फत नदीघाटाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. नदीमध्ये जलप्रदुषण होऊ नये याकरिता मुर्ती विसर्जनकरिता कृत्रिम कुंड बांधण्यात आले आहे. याद्वारे पर्यावरणपूरक गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यास मदत होत आहे.



विजेच्या बचतीसाठी उपाययोजना 


विजेची बचत होण्यासाठी शहरातील सर्व पथदिव्यांना एलईडी बल्ब बसविण्यात आले आहेत. त्यामुळे विद्युत बिलामध्ये घट होऊन नगरपरिषदेची बचत होत आहे. नगरपरिषदेच्या एकूण ४ इमारतीवर सोलार प्रकल्प बसविण्यात आले आहे. यामुळे सुध्दा विद्युत बचत होत आहे. शहरातमध्ये सौरऊर्जाबाबत जनजागृती होण्यासाठी नगरपरिषदमार्फत विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आल्या. यामुळे शहरात सौरऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे.


 पर्यावरणासंदर्भात जनजागृती

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी पर्यावरणाच्या अनुषंगाने विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये चर्चासत्र, पथनाट्य, बॅनर, विविध स्पर्धा, घंटागाडीद्वारे प्रचार व प्रसिध्दी इत्यादी बाबींचा समावेश आहे. याकामी पर्यावरण दूत यांची नेमणूक करण्यात आली आहे. नगरपरिषद मार्फत सोशल मिडीयावर सुध्दा प्रचार व प्रसिध्दी करण्यात आली आहे.



नगरपरिषदमार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम


नगरपरिषदमार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये ई-रिक्षा खरेदी, स्टेप इलेक्ट्रीसीटी जनरेटर, विद्युत वाहनांकरिता चार्जींगस्टेशन, उद्यानामध्ये सौरऊर्जा लाईट बसविण्यात आले. नागरिकांसाठी कापडी पिशवी वेडींग मशीन, वायु गुणवत्ता तपासणीकरिता डिजीटल डिस्प्ले, नगरपक्षी चिमणी'चे प्रतिकृती बसविण्यात आली आहे. शहरात विविध ठिकाणी माझी वसुंधराच्या अनुषंगाने जागा विकसीत करण्यात आली आहे.



माझी वसुंधरा अभियानामध्ये नगरपरिषदेने केलेल्या कामाची तपासणी शासनाकडील समिती मार्फत करण्यात आली आहे. यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये गडहिंग्लज शहराने पहिला क्रमांक मिळवीला आहे तसेच भूमी या घटकामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने राज्यात १ ला क्रमांक पुरस्कार जाहिर झाला आहे.


 बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी 👇🏼




गडहिंग्लजकरांसाठी आनंदाचा क्षण  

राज्यात पहिलासाठी रु. ४ कोटी व भूमी पहिलासाठी रु. १.५ कोटी असे तब्बल ५.५ कोटी चे बक्षीस पालिकेला प्राप्त होणार आहे. सर्व गडहिंग्लजकरांसाठी हा आनंदाचा क्षण असून गडहिंग्लज नगरपरिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सर्वोच्च सन्मान प्राप्त झाला आहे. शहरात स्वच्छता अभियान बरोबरच पर्यावरणाशी निगडीत विविध कामे व उपक्रम राबविण्यात आले आहेत. याकरिता शहरातील पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, नगपरिषदकडील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने माझी वसुंधरा अभियान हा सर्वोच्च पुरस्कार मिळणेस मदत झाली आहे. नगरपरिषदकडील वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे. विशेष बाब म्हणजे शहरातील पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक व संस्था यांनी सीएसआर निधी/देणगीच्या माध्यमातून नगरपरिषदेस मदत केल्याने अभियानात उत्कृष्ट कामगीरी करता आली. मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल गंदमवाड, पाणी पुरवठा अभियंता, धनंजय चव्हाण, तत्कालीन विद्युत अभियंता,  रविनंदन जाधव, मिळकत व्यवस्थापक, निखील पाटील, बांधकाम अभियंता, श्रीमती अवंती पाटील, तत्कालीन कर निरीक्षक, प्रशांत शिवणे, स्वच्छता निरीक्षक इत्यादी विभागप्रमुखांनी तसेच सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



नागरिकांच्या सहकार्यामुळे पालिकेला यश : मुख्याधिकारी स्वरूप खारगे




गडहिंग्लज नगरपरिषदेने माझी वसुंधरा अभियान अंतर्गत राज्य स्तरावर चांगली कामगिरी केली असून शहरातील सर्व पदाधिकारी, प्रतिष्ठीत नागरिक, अधिकारी तसेच कर्मचारी यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप आभार. माझी वसुंधरा अभियानात शहरातील सर्व नागरिकांनी सहकार्य केल्याने उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत झाली आहे. यापुढे सुध्दा सर्वांनी अशाच प्रकारे प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी स्वरुप खारगे यांनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.