गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांना त्रास देण्यासाठी एका ग्रामस्थाने बंद केलेला तालुक्यातील तेरणी गावातील पाणंद रस्ता आज पोलीस बंदोबस्तात महसूल विभागाने खुला केला. त्यामुळे रस्त्याअभावी होणारे शेतकऱ्यांचे हाल थांबले आहेत. भर पावसात सरपंच करवीर उथळे यांच्यासह महसूल व पोलीस टीमने हा पाणंद रस्ता खुला करून दिल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, तेरणी येथे सीमेकडील बाजूस गट नंबर २१५ मध्ये शेतकऱ्यांसाठी पाणंद रस्ता उपलब्ध होता. पूर्वापार असलेल्या या पाणंद रस्त्याचा वापर हा शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी, पिकांची वाहतूक करण्यासाठी केला जात होता. मात्र हा रस्ता जाणून बुजून शेतकऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने या मार्गावरील एका ग्रामस्थाने बंद केला होता. शेतकऱ्यांनी विनंती करून देखील रस्ता खुला करण्यास त्यांनी नकार दिल्याने शेतकऱ्यांचे रस्त्याआभावी मोठे हाल होत होते. या संदर्भात या भागातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनातून या समस्येकडे लक्ष वेधले होते. जाणून बुजून त्रास देण्याच्या हेतूने हा रस्ता बंद केल्याचे निवेदनात शेतकऱ्यांनी म्हटले होते. हा पाणंद रस्ता खुला करून देण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती.
याची दखल घेत तहसीलदारांनी तातडीने मंडल अधिकारी व तलाठी यांना सूचना देत पोलीस संरक्षणात हा रस्ता खुला करून देण्याची सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सरपंच करवीर उथळे, पोलीस पाटील जी एन पाटील, मंडल अधिकारी व्ही ए कामत, तलाठी किरण आंबुलकर, अभिजीत डोंगरे, कोतवाल भीमा इंगवले यांच्या उपस्थितीत पोलीस संरक्षणात हा पाणंद रस्ता खुला करण्यात आला. यावेळी रहेमान सनदी, माजी सैनिक संभाजी कुरळे, मोसिन मुल्ला, रवींद्र नाईक, बिराप्पा धनगर, संजय गुरव, करवीर नावलगी, हुसेन साबखान उपस्थित होते.








