पुलाच्या कठड्याला अडकलेला कचरा काढण्याची मागणी
निलजी बंधारा अद्याप पाण्याखालीच
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज- चंदगड मार्गावर हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावरील पाणी मंगळवारी पहाटे ओसरले असून रस्ता वाहतुकीस मोकळा झाला आहे. त्यामुळे सकाळपासून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
आजरा, आंबोलीसह गडहिंग्लज तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे हिरण्यकेशी नदीला पूर आला होता. पाण्याची पातळी वाढून भडगाव पुलावर पाणी आल्याने रविवार रात्रीपासून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या सूचनेनुसार महसूल, पोलीस, रेस्क्यू पथक, आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य वसंत नाईक, पोलीस पाटील उदय पुजारी, तलाठी सौ. रुपाली कांबळे यांनी या मार्गावरील वाहतूक बंद करत दक्षता घेतली होती. वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून पर्यायी मार्ग सुचवण्यात आला होता.
त्यामुळे सदर वाहतूक ही गजरगावमार्गे सुरू होती. भडगाव पुलावरील वाहतूक बंद झाल्याने चंदगडसह तालुक्याच्या पूर्व भागाचा संपर्क तुटला होता. हलकर्णी भागासाठी एसटी वाहतुक ही संकेश्वर मार्गे सुरू होती. शालेय विद्यार्थ्यांचीही गैरसोय झाली होती.
पुलाच्या कठड्याला अडकलेला कचरा काढण्याची मागणी
पुराच्या पाण्यामुळे भडगाव पुलावरील कठड्याला कचरा अडकला आहे. सदर कचरा रस्त्यावर आल्यास वाहने घसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित विभागाने हा कचरा हटवून रस्ता निर्धोक करावा अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांतून होत आहे.
निलजी बंधारा अद्याप पाण्याखालीच






