गडहिंग्लज तालुका जनता दलाच्या वतीने राष्ट्रपतींकडे मागणी
प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन केले सादर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): मणिपुरमध्ये अनेक महिलांची नग्न धिंड व व त्यांच्यावर केलेल्या अत्याचाराची घटना ही संपूर्ण देशाला अस्वस्थ करणारी आहे. या घटनेचा गडहिंग्लज तालुका जनता दल (से) च्या वतीने निषेध करण्यात आला. याप्रकरणी दोषीना कठोरातील कठोर शिक्षा करण्यात यावी व केंद्रातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी जनता दलाने राष्ट्रपतींच्या नावे प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. सदर निवेदन जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, मणिपुरमध्ये कुकी समाजातील अनेक महिलांची नग्न धिंड काढली जात आहे. अनेकजण रस्त्यातच त्या महिलांचा विनयभंग करत आहेत. शेतात ओढत नेऊन त्यांच्यावर सामुहिक अत्याचार केला जात आहे. बऱ्याच लोकांनी जीव गमावलेले आहेत. वरकरणी हा कुकी आणि मैतेई या दोन समुहामधील वाद असल्याचे दिसत असले तरीही मोदी सरकार अस्तीत्वात आल्यापासून उग्रवादी संघटनेने जातीय द्वेष यामागचे प्रमुख कारण आहे. आता युनायटेड कुकी लिबरेशन या उग्रवादी संघटनेत फुट पडली व संघटनेचा प्रमुख यापूर्वीच एस. एस. हायकोप यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून मैतेई समुदायावर निर्बंध लावण्याची मागणी केली होती. हे पत्र आणि भाजपने उग्रवादी संघटनेशी केलेला करार उघड होताच मैतेई संघटनेचे लोक उग्र होऊन रस्त्यावर उतरले. यावेळी त्या संघटनेतील कुकी उग्रवाद्यांनी मैतेई समाजातील लोकांना अक्षरश: घरातून ओढुन जीवंत जाळायला सुरवात केली. आतापर्यंत या समाजातील ३०० हुन अधिक लोकांची हत्या झाली आहे व १७०० घरें उध्वस्त केली असून ३ ते ४ हजार लोक घरदार सोडून गेले आहेत. अनेक महिलांवर सामुदायिक अत्याचार केले जात आहेत. ही उग्रवादी संघटना इतकी हिंस्त्र झाली आहे की, बलात्कार, अत्याचार याच्यावर नियंत्रण भाजप सरकार आणू शकत नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून काहीच पावले उचललेली नाहीत.
भारताच्या ७० वर्षांच्या इतिहासात देशातील एका राज्यात दोन महिने अशा प्रकारचा हिंसाचार, अत्याचार सुरु असणे ही लाजीरवाणी बाब आहे. मणिपुरमध्ये हिंसाचार, जाळपोळ, बलात्कार, हत्यांचे सत्र सुरूच आहे. महिलांच्यावर दिवसाढवळया देशामध्ये अशा पद्धतीने घटना घडणे हे अत्यत निंदनिय आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. महिलांच्यावर अत्याचार होऊ नये यासाठी निर्बंध घालावेत व देशातील सरकार हे गोरगरीब, कष्टकरी जनतेवर अन्याय करणारे सरकार असल्यामुळे ते सरकार बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी या निवेदनातून राष्ट्रपतींकडे करण्यात आले आहे.
यावेळी जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक, शहराध्यक्ष काशिनाथ देवगोंडा, कार्याध्यक्ष उदय कदम, माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, माजी नगरसेविका सौ. सुनिता पाटील, सागर पाटील, ॲड. नाज खलिफा, कॉम्रेड धोंडीबा कुंभार, राजेश बोरगावे, सानिका वालकर, अस्मिता संकेश्वरी, संजना संकेश्वरी, प्रणाली कोळी, पूजा कुंभार, सानिया ताशिलदार यांच्यासह जनता दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

