➲ गेल्या चार वर्षात चंदगड विधानसभा मतदारसंघात साडेआठशे कोटींची रेकॉर्ड ब्रेक विकास कामे!
➲ एक हजार कोटींचा विकास निधीचा टप्पा पूर्ण करणारच!
➲ आमदार राजेश पाटील यांनी घेतला मतदार संघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास
➲ खमलेहट्टी, अर्जुनवाडी, सरोळी, सांबरे, डोणेवाडी, लिंगूर तर्फे नेसरी, भडगाव येथे विविध विकास कामांचा शुभारंभ
➲ गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघातील गावागावात विकास कामे युद्धपातळीवर सुरू
गडहिंग्लज (संतोष नाईक): आमदार राजेश पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतला आहे. संपूर्ण मतदारसंघातील एकही गाव विकासापासून सुटलेले नाही. सध्या गडहिंग्लज तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद मतदार संघ निहाय गावागावातील विकास कामांसाठी कोट्यवधीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा विचार करता आमदार राजेश पाटील हे चंदगड विधानसभा मतदारसंघात गेल्या चार वर्षात 1000 कोटी विकास निधीच्या टप्प्यापर्यंत पोहोचले आहेत. हा विकास कामांचा रेकॉर्ड ब्रेक इतिहासच म्हणावा लागेल.
आज खमलेहट्टी (ता. गडहिंग्लज) येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या खमलेहट्टी ते चिंचवाडी व नौकुड हसुरसासगिरी 5 कोटी 16 लाख तसेच भडगाव- चनेकुप्पी- नुल बसर्गे या 7 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या रस्ता कामाच्या शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना आमदार राजेश पाटील म्हणाले, गेल्या चार वर्षात चंदगड विधानसभा मतदारसंघात साडेआठशे कोटीचा निधी आणला आहे. उर्वरित सात-आठ महिन्यांमध्ये आणखीन काही निधी आणून 1000 कोटीचा टप्पा पूर्ण करायचा आहे. यासाठी तुमची साथ मला हवी आहे. आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे आणि मतदारसंघातील जनतेने साथ दिल्यामुळे विकास कामांसाठी भरमसाठ निधी खेचून आणण्यात मला यश मिळाले.
दळणवळणाची व्यवस्था झाल्याशिवाय मतदारसंघाचा विकास होत नाही. रस्त्यावरील वाहतूक निर्धोक होण्यासाठी रस्त्यांचे रुंदीकरण देखील होणे गरजेचे आहे, हे लक्षात घेऊन साईडपट्ट्या मजबुतीसह रस्ता रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. याचा आराखडा तयार केलेला आहे. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या वाढवण्याची शक्यता आहे. त्यासाठी शासकीय यंत्रणा, संबंधित ठेकेदार यांना ग्रामस्थांनीही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विधानसभेचे माजी अध्यक्ष स्व. बाबासाहेब कुपेकर यांनी शेवटच्या श्वासापर्यंत मतदार संघाच्या विकासासाठी झटले. त्यांच्या निधनानंतर माजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी त्यांची परंपरा पुढे चालवले. मतदारसंघाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी त्यांनी खेचून आणला. त्यांच्या माध्यमातून 2019 साली मोठ्या विश्वासाने ही धुरा माझ्या खांद्यावर सोपविण्यात आली. त्यांनी साथ दिल्याने एवढे मोठे शिवधनुष्य आज मी पेलू शकलो. मतदारसंघासाठी साडेआठशे कोटीचा निधी मिळाला असला तरी 1000 कोटीचा टप्पा आगामी सात- आठ महिन्यांमध्ये आपल्याला ओलांडायचा आहे. मतदार संघातील विविध प्रश्ने, समस्या कशा मार्गी लागतील यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. मतदारसंघाचा सर्वांगीण विकासाला माझे प्राधान्य राहील.
त्याबरोबरच सकल मराठा समाजाचा जो प्रश्न होता जो मराठा समाजाला आरक्षण मिळवून घेण्यासाठीचा. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनाची जाणीव सरकारला करून देण्यासाठी आमच्यातले काही आमदार व आम्ही महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर उपोषणाला बसलो. दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाला जागं करण्यासाठी आम्ही मंत्रालयाला कुलूप लावून त्या मंत्रालयाच्या दारात आंदोलन केलं. त्यावेळेला आम्हाला अटक सुद्धा झाली. सकल मराठा समाज बांधवांच्या या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि सर्व मंत्रिमंडळ मराठा समाजाला कोर्टात टिकणारे आरक्षण कसे देता येईल त्यासाठी ते धडपडत आहेत. त्या दृष्टीने पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे मराठा समाजाला लवकरात लवकर न्याय मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
प्रारंभी स्वागत बाबुराव चौगुले यांनी तर प्रास्ताविक सरपंच शंकर सुतार यांनी केल. यावेळी आमदार राजेश पाटील यांच्यासह मान्यवरांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन आमदारांचे स्वागत केले. खमलेहट्टी मराठा समाजाच्या वतीने आमदारांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील, जयसिंग चव्हाण, विकी कोणकेरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास बाबासाहेब पाटील, रामाप्पाण्णा करिगार, महाबळेश्वर चौगुले, संतोष पाटील, जयसिंग चव्हाण, अभय अडकुरकर, विकी कोणकेरी, जयकुमार मन्नोळी, सुरेखा चौगुले, संतोष खैरे, महादेव माने नेताजी जाधव, फुलाजी खैरे, अप्पासाहेब जकाते, प्रविण माने, जोतिबा खैरे, चंद्रकांत माने, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार ज्योतिबा माने यांनी मानले.






