Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता जपली पाहिजे

ज्येष्ठ विचारवंत क्रांतीकुमार शहा यांचे मत


गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात व्याख्यान संपन्न 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीला चालना दिली पाहिजे तसेच जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मानवता जपली पाहिजे. आपण घडत असताना आपल्या करिअरमध्ये ज्ञानाच्या पलीकडे जाऊन काय करता येईल याकडे निरीक्षणातून घडण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत श्री क्रांतीकुमार शहा यांनी केले.



गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. प्रारंभी स्वागत व प्रास्तावीक प्रा.आझाद पटेल यांनी केले.


या व्याख्यान कार्यक्रमात ‘आजचा युवक व आपला भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना क्रांतीकुमार शहा पुढे म्हणाले,  आपण मानव म्हणून जन्माला आलो आहोत. मानव म्हणून जगत असताना तिरस्कार बाळगू नका. आपण समजून घेऊन निसर्गाने दिलेल्या गोष्टींचा वापर करून जे-जे काही चांगले करता येईल त्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. आपल्या देशासाठी अनेकांनी केलेला त्याग व दिलेले योगदान हे विसरता येणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या देशासाठी आय. आय. टी., आय. आय. एम.,भाक्रानांगल, कोयना प्रकल्प, लोखंडी कारखाने हे निर्माण करून देखील आज त्यांनी देशासाठी काय योगदान दिले आहे असा जो प्रश्न विचारला जात आहे. अलीकडे बातम्या दाखवून व ढोंगी प्रचार करून केवळ फसविले जात आहे. जगातले सगळे देश हे आपल्याकडे मार्केट म्हणून पाहत आहे. जगामध्ये युक्रेन-रशिया, व अन्य देशांमध्ये सुरु असलेले युद्ध तसेच भारत-पाकिस्तान वाद धुमसत ठेवण्यामध्ये बलाढ्य राष्ट्रांचे आपले मार्केट चालविण्याचा हा उद्योग आहे असे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या देशात शेतकरी कर्ज फेडता येत नाही म्हणून आत्महत्या करीत आहे. अनेक बेरोजगारांना रोजगारापासून वंचित ठेवले जात आहे. जोपर्यंत समाजाचे नेतृत्व करणारी माणसं या देशात निर्माण होत नाहीत. तोपर्यंत या देशाचा व समाजाचा विकास होणे दुर्लभ आहे. कोणतेही उद्योगपती, अथवा कर्तृत्ववान व्यक्ती या निरीक्षण कार्यातून आणि अनुभवातून मिळालेल्या शिदोरीवरच मोठे झाले आहेत. असे स्पष्ट करून त्यांनी आपल्या जीवनात आपण कसे घडलो आहोत.याचा वस्तुपाठच विद्यार्थ्यांसमोर मांडला.



प्रा. किसनराव कुराडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून नव्या पिढीसमोर आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजाच्या घडणीमध्ये आपल्या परीने योगदान देणारे व्यक्तिमत्व कळलेच पाहिजेत. त्यांनी केलेल्या त्यागातून समाज कस घडतो हे समजलेच पाहिजे. यासाठी विद्या संकुलातील विद्यार्थ्यांसमोर असे आदर्श व्यक्तिमत्व आणून त्यांच्या कार्याचा आदर्श विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी मौलिक ठरावा हा उद्देश असल्याचे त्यांनी सागितले. यावेळी क्रांतीकुमार शहा यांनी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्येष्ठ साहित्यिक प्रा. किसनराव कुराडे लिखित ग्रंथ बक्षीस म्हणून देऊन गौरविण्यात आले  त्यांनी ज्येष्ठ पत्रकार व लेखक दशरथ पारेकर, उद्योजक प्रकाश शहा, प्रा.विक्रम शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. आभार प्रा.नितीन चव्हाण यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.