विद्युत पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना अंधारात बसण्याची वेळ
वारंवार समस्या निर्माण होत असल्याने ग्रामस्थ हैराण
गडदराम यांच्या शेतानजीकच्या डीपीतून वारंवार समस्या
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील तेरणी गावात बुधवारी रात्री काही भागात अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्याने या भागातील घरांमध्ये रात्रभर अंधार पसरला. गडदराम यांच्या शेतानजीक असणाऱ्या डीपीतून ही समस्या वारंवार निर्माण होत आहे. त्यामुळे सदर डीपी बदलून नवे डीपी बसविण्यात यावे अशी मागणी होत आहे. या समस्येकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी सोडविण्याची गरज आहे. दरम्यान, सकाळपासून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम हाती घेण्यात आले. आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
बुधवारी रात्री आठच्या दरम्यान अचानक गावातील देसाई गल्ली , नाईक गल्ली तसेच मनवाड रोडवरील पाण्याच्या टाकी परिसरातील बहुतांश घरांमधील व इतर ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडित झाला. केवळ गल्लीतील पथदिवे सुरू होते. या भागातील सर्व घरांमध्ये विद्युत पुरवठाअभावी अंधार पसरला होता. येथील गडदराम यांच्या शेतानजीक असणाऱ्या डीपी मधून वारंवार ही समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे गावातील काही भागात विद्युत पुरवठा खंडित होण्याची समस्या उद्भवत आहे. बऱ्याच वेळा काही मोजक्याच घरांमधील विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे सदर डीपीतील बिघाडाची कायमस्वरूपी दुरुस्ती होणे गरजेचे आहे. या ठिकाणी असणारी डीपी बदलून नवीन बसविण्यात यावी अशी मागणी होताना दिसत आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान विद्युत पुरवठा सुरळीत केला. मात्र, वरिष्ठांनी ही समस्या सोडवण्यासाठी गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे.

