गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजन
गोव्याच्या समीर नाईक यांची प्रमुख उपस्थिती
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे शनिवारी (ता.२९) फुटबॉलपटूंचा गौरव केला जाणार आहे. गतहंगामात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४७ खेळाडूंचा सत्कार होईल. भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार आणि धेंपोचे प्रशिक्षक समीर नाईक, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिशएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची प्रमुख उपस्थिती आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या शाहू सभागृहात सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
दरवर्षी हंगामाच्या समारोपाला उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे या हेतूने हा गौरव समारंभ होतो. यंदा युनायटेडच्या यासीन नदाफ, सागर पोवार यांनी संतोष ट्रॉफीत, अभिषेक पोवारने नॉर्थ ईस्ट युनायटेड संघाकडून चमकदार कामगिरी केली. वेदांत कडूकर, आर्यन पाटील, कृतिका कुराडे यांनी चौदा वर्षाखालील राष्ट्रीय स्पर्धेत चांगला खेळ केला. समर्थ निकमने कनिष्ठ इंडियन लीग (आय लीग), वीर पाटील व धीरज कुरबेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हा संघातून आंतरजिल्हा स्पर्धेत ठसा उमटविला. सुल्तान शेख याने डि लायसन्स परिक्षा उतीर्ण केली.
सांघिक स्तरावर युनायटेड सतरा वर्षाखालील संघाने यवतमाळ अखिल भारतीय स्पर्धा, डेरवन राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपद, रिलायन्सचे जिल्हास्तरीय उपविजेतेपद पटकाविले. वरिष्ट संघाने दिवाळीतील अखिल भारतीय स्पर्धेत चौथा तर कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन ग्रामीण लीग स्पर्धेचे सहाव्यांदा अजिंक्यपद मिळवले. युनायटेड स्कुलच्या चौदा वर्षाखालील संघाने बेळगाव आंतरराज्य ग्रासरूट स्पर्धेचा विजेता ठरला. कार्यक्रमास गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कोपार्डेच्या खाडे महाविदयालयाचे प्रा. डॉ. अभिजित वणिरे हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद, उपाध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी आणि संचालक मंडळाने केले आहे.
ओळख समीर नाईकांची...
बचावपटू, भारतीय संघाचे कर्णधार
आय लीग धेंपोकडून चारदा विजेतेपद
प्रशिक्षक धेपों गोवा लीग विजेतेपद
प्रशिक्षक धेंपो व्दीतिय क्षेणी आय लीग उपविजेतेपद


