गडहिंग्लज युनायटेड असोसिएशन मार्फत फुटबॉलपटूंचा गौरव
गडहिंग्लज (प्रतिनिधी): एकेकाळी भारत आशिया खंडात बलाढ्य संघ म्हणून ओळखला जायचा. पण, गेल्या तीन दशकात आपली घसरगुंडी झाली आहे. फुटबॉलपटूंना सुविधा वाढल्या असल्यातरी दुर्देवाने दर्जा कमी झाला. किंबहूना आपल्या प्रतिस्पर्धी देशांनी अधिक प्रगती केली. त्यामुळे नव्या पिढीतील खेळाडूंनी ईमानदारीने अधिक झोकून देऊन मेहनत घेण्याची आवश्यकता गोव्याच्या धेंपोचे प्रशिक्षक आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार समीर नाईक यांनी व्यक्त केली.
गडहिंग्लज येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन मार्फत खेळाडूंच्या गौरव समारंभात ते प्रमुख पाहूणे म्हणून बोलत होते. पालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, गोकुळचे संचालक नावेद मुश्रीफ, शारिरीक शिक्षण संचालक प्रा. डॉ. अभिजित वणिरे, युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जून बेल्लद यांची प्रमुख उपस्थिती होती.
रोपटयाला पाणी घालून कार्यक्रमाची सुरवात झाली. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात हंगामातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतला. प्रशिक्षक नाईक पुढे म्हणाले, 'नव्या पिढीला खुप संधी आहे. अद्यावत प्रशिक्षण, खेळण्याची अधिक संधी याचा वापर त्यांनी करायला हवा. ईमानदारीने मेहनत घेणाऱ्याला यश निश्चित आहे.
प्रा. डॉ. वणिरे म्हणाले, 'मोठ्या शहरात इतिहासजमा झालेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा सोयी सुविधा नसतानाही गडहिंग्लजकरांना अर्ध दशकापासून चिकाटीने जपल्या हे कौतुकास्पद आहे.' श्री. मुश्रीफ म्हणाले, " फुटबॉल ही गडहिंग्लजची ओळख आहे. ती जपण्यासाठी फौडेंशनमार्फत कोणत्याही मदतीसाठी सदैव तत्पर राहिन. यावेळी संतोष ट्रॉफी खेळलेले यासीन नदाफ, सागर पोवार, अभिषेक पोवारसह यवतमाळ, डेरवण, बेळगाव येथील स्पर्धेत विजेते ठरलेल्या एकुण 47 फुटबॉलपटूंचा क्रीडा साहित्य देऊन गौरव झाला.
ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील, संभाजी शिवारे, प्रशांत दड्डीकर, गुडूं पाटील, रफिक पटेल, अभिजित चव्हाण, महेश सुतार यांच्यासह पालक, खेळाडू उपस्थित होते. मनिष कोले यांनी आभार मानले.
प्रोत्साहन योग्यवेळी हवे!
आपल्याकडे यशस्वी होणाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. प्रत्यक्षात कुमार आणि युवा गटातच अधिक प्रोत्साहनाची गरज असते. या वयात प्रोत्साहन मिळाले तर अधिक चांगली कामगिरी करण्याची उर्जा शंभर पटीने वाढते. त्यामुळे युनायटेडची उद्योन्मुख खेळाडूसाठीची हि कौतुकाची थाप योग्य वेळी असल्याचे श्री नाईक यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे व्हिडिओ येथे पहा 👇






