मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत ' अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता ' म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली.
महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात सहाव्या क्रमांकावर गेला आहे, गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे. कृषी व संलग्न क्षेत्राचा विकासदर २.५० टक्क्यांपेक्षा जास्त घटला, सेवा क्षेत्रातील विकासदर ४.२ टक्क्यांनी घटला आहे, यावरूनच हे अधोगती सरकार आहे अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या वाट्याला येतील अक्षता महायुती सरकारने घेतली दक्षता, अब की बार महाराष्ट्रातील उद्योगधंदे सीमापार, शेजारी तुपाशी महाराष्ट्र उपाशी, शेतकरी झाला कर्जबाजारी सरकार वसुलीत बेजारी, असे फलक हातात घेत महाराष्ट्राला गुजरातच्या मागे टाकणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, महाराष्ट्राला दिवाळखोरीत नेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत आंदोलन केले.
श्री वडेट्टीवार म्हणाले की,राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात शेती उत्पन्नात मोठी घट झाली आहे. ह्या सरकारचे कृषी क्षेत्राकडे दुर्लक्ष होत आहे. आज गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला हेच महायुती सरकारचे अपयश असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

