Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज तालुका मोटरपंपधारक अन्याय निवारण समितीने साजरा केला आनंदोत्सव

वाढीव पाणीपट्टी विरोधातील लढ्याला  मिळाले यश


पाणीपट्टी जुन्या कराप्रमाणेच वसूल करण्याचे आदेश 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): मोटर पंपधारकांना अन्याय ठरणारी वाढीव पाणीपट्टीचा निर्णय मागे घेत मोटर पंपधारक शेतकऱ्यांकडून जुन्या दरानेच पाणीपट्टी भरून घेण्याचा आदेश नुकताच जलसंपदा विभागाने काढल्याने गडहिंग्लजला मोटरपंपधारक अन्याय निवारण समितीच्या वतीने साखर वाटून आनंदोत्सवसाजरा करण्यात आला. या संदर्भात २९ मे रोजी कॉम्रेड भारत पाटणकर, आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार बाबा लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात गडहिंग्लज तालुका मोटरपंपधारक अन्याय निवारण समितीने देखील सहभाग घेतला होता.



महाराष्ट्र जल संपत्ती नियम प्राधिकरणकडील दि. २९ मार्च २०२२ रोजीचा ठोक जल शुल्क निर्धारण आदेशाप्रमाणे महाराष्ट्र शासन व पाटबंधारे विभागाकडून हेक्टरी १३६५ वरून २७००० रुपये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणीपट्टी वाढ करण्यात आली होती. सदर अन्यायकारक  वाढीव पाणीपट्टी रद्द करण्यात यावी यासाठी  दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी गडहिंग्लज पाटबंधारे विभागावर मोटर पंपधारक अन्याय निवारण समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. या भरमसाठ वाढीव पाणीपट्टीमुळे शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले होते.



यासंदर्भात  कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यांची बैठक सांगली येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात कोल्हापूर जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व आमदार बाबा लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे व पाटबंधारे विभागाचे  अधिक्षक अभियंता यांच्या उपस्थितीत पार पडली होती. या बैठकीमध्ये वाढीव पाणीपट्टी प्रमाणे कर आकारणी न करता जुन्या कराप्रमाणे म्हणजेच रूपये १३६५ प्रमाणे भरून घेण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यामुळे गडहिंग्लज विभागातील सर्व शेतकऱ्यांनी जुन्या पाणीपट्टी दरानेच म्हणजेच रक्कम  १३६५ रुपये प्रमाणे भरावे असे आवाहन गडहिंग्लज विभाग शेतकरी सर्व मोटरपंपधारक अन्याय निवारक समितीच्या वतीने केले होते. दरम्यान, या संदर्भातील अधिकृत आदेश काढण्यात आल्याने आज गडहिंग्लज येथे साखर वाटून आनंद साजरा करण्यात आला.




यावेळी माजी सभापती अमरसिंह चव्हाण, बाळगोंडा पाटील, शिवाजीराव माने, अमृत शिंत्रे, नागेश चौगुले, गुरुराज हत्ती, वसंत नाईक, सचिन जाधव, सतीश पाटील, प्रशांत देसाई, शेखर मोळदी, बाळासाहेब कोरी, संजय नाईक, बसवराज बंदी, अंकुश रणदिवे, शिवमुर्ती फुंडे, नितीन पाटील, संजय कदम, राजू बंदाई, शिवाजी राऊत, अनिल वळतकर, शिवाजीराव पाटील, काशिनाथ मोर्ती यांच्यासह इतर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.