इफा लायन्स ठरला उपविजेता, श्रेयस - अर्थव तिसरा
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चुरशीच्या अंतिम फुटबॉल सामन्यात गुफा गार्डीयन्सने इफा लायन्सला टायब्रेकरमध्ये ६-५ गोलनी नमवुन विजेतेपदासह रोख अकरा हजार रुपये आणि प्रतिष्ठेचा शिवराज युनायटेड डेव्हलपमेंन्ट करंडक पटकाविला. श्रेयस अर्थव वॉरियर्सने युनायटेड रायझिंग स्टार्सला ४-२ असे हरवून तिसरा क्रमांक मिळविला. गार्डियन्सचा आर्यन दळवी स्पर्धावीर तर विदयाधर धबाले सामनावीर ठऱला. येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे गेले आठ दिवस हि स्पर्धा एम. आऱ. हायस्कुलच्या मैदानावर सुरु होती. सामना पाहण्यासाठी शौकीनांची गर्दी होती.
पुर्वार्धात अनपेक्षितपणे तब्बल दोन गोलने पिछाडीवर पडलेल्या गुफा गार्डियन्सने उत्तरार्धात झूंजार खेळ करून सामन्याचे पारडे पलटविले. इफाच्या नवोदित आदित्य लाखेने गार्डीयन्सच्या बचावफळी आणि गोलरक्षकातील गाफीलपणाचा फायदा उठवत १४ आणि १७ व्या मिनिटाला दोन धक्कादायक गोल नोंदविले. उत्तरार्धात गार्डीयन्सचा हुकमी खेळाडू विद्याधर धबाले २७ आणि ४० व्या मिनिट असे दोन गोल करीत संघासाठी धावला. निर्धारित वेळेत २-२ अशी बरोबरी राहिल्याने पंचानी टायब्रेकरचा अवलंब केला. यात इफाच्या सौरभ मोहिते, महेश पोवार, सिध्दार्थ दड्डीकर तर गार्डीयन्सतर्फे विदयाधर धबाले, शुभम कागिनकर, प्रविण पोवार, सृश्रृत सासने यांनी अचूक गोल करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, श्रेयस –अर्थव वॉरियर्सने युनायटेज रायझिंग स्टार्सचा ४-२ अशी मात करुन तिसरा क्रमांक मिळविला.
शिवराज विदया संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, युनायटेडचे अध्यक्ष मल्लीकार्जून बेल्लद, गोव्याचे प्रशिक्षक रवी नाटेकर, गुंडू पाटील यांच्याहस्ते विजेत्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धावीर म्हणून आयर्न दळवीला सायकल देण्यात आली. समन्वयक रोहित साळुंखे, अनिकेत कोले, पंच ओमकार घुगरी, सागर पोवार, प्रथमेश धबाले, अभिषेक पोवार यांचा सत्कार झाला. स्पर्धा संयोजक दिपक कुपन्नावर यांनी स्पर्धेचा आढावा घेतला. संभाजी शिवारे, अजीम पठाण, संतोष मांगले, सुनिल कलाल, रविंद्र मोरे, अरुण पाटील, सुभाष पाटील, ए. एम. हासूरे उपस्थित होते. ललित शिंदे यांनी सुत्रसंचलन केले. महेश सुतार यांनी आभार मानले.
स्पर्धेतील सर्वोत्कष्ठ खेळाडू
स्पर्धावीर- आर्यन दळवी (गार्डियन )
गोलरक्षक – अर्थव जाधव (इफा)
बचावपटू- सुशांत देवार्डे ( श्रेयस अर्थव)
मध्यरक्षक- विदयाधऱ धबाले (गार्डीयन्स)
आघाडीपटू- सौरभ मोहिते (इफा)
उदयोन्मुख – आलोक पाटील (श्रेयस -अर्थव)


