Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी पूरग्रस्त संघर्ष समिती १२ ऑगस्टला भडगाव पुलावर करणार रास्ता रोको आंदोलन

पुलांची उंची वाढवावी व नद्यांमधील गाळ काढण्याकडे वेधणार लक्ष 





गडहिंग्लज (प्रतिनिधी) : हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी पूरग्रस्त संघर्ष समिती गडहिंग्लज, आजरा, चंदगड यांच्यावतीने तिन्ही नदीवरील पुलांची उंची वाढवावी व नद्यांमधील गाळ काढण्यात यावे या मागण्यांसाठी दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता भडगाव पुलावर 'रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून या संदर्भातील निवेदन समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.



या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज, आजरा, चंदगड या तालुक्यांमधून हिरण्यकेशी, घटप्रभा व ताम्रपर्णी नद्या वाहतात. दरवर्षी त्यावर असणारे पूल अतिवृष्टीने पाण्याखाली जातात त्यामुळे गावा-गावांचा व तालुक्यांचा संपर्क तुटून लोकांचे अतोनात हाल होत आहेत. त्याचे एकमेव कारण म्हणजे नदीच्या पूर्ण पात्रात असणारे गाळ. पुराच्या पाण्यामुळे  नदीच्या पात्राकडे असणारी पिके कुजत आहेत. नदीच्या कडेला असणारी गावे पाण्याखाली गेल्यामुळे घरांची पडझड होत आहे. २०१९, २०२१ आणि २०२४ मध्ये महापुराचा तडाखा बसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. शासन याकडे दुर्लक्ष करत असून शासनाला जाग आणण्यासाठी तिन्ही तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व जनतेला घेऊन हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे.


हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी नदीवरील पुराच्या पाण्याखाली जाणाऱ्या सर्व पुलाची उंची वाढवावी, नद्यांमधील गाळ व वाळू काढून खोली वाढवावी, पूर बाधीत शेतीचे पंचनामे करून विना अट जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांच्या व सहकारी संस्थाच्या पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थाना सरसकट विजमाफी मिळावी, शेती व शेतीपूरक व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण कर्जमाफी व्हावी आदी मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.


निवेदनावर बाळेश नाईक, उदय कंदम, श्रीरंग चौगुले, रमेश मगदूम, बाळकृष्ण परीट, महेश उर्फ बंटी कोरी, हिंदूराव नौकुडकर, अरुण पाटील आदींच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.