पूरग्रस्तांनी दिला प्रशासनाला इशारा, अल्टीमेटम
गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीचा मोर्चा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): घटप्रभा खोऱ्यातील हिरण्यकेशी, ताम्रपर्णी नद्यांना सातत्याने येणाऱ्या पुराचा शास्त्रीय अभ्यास करून त्यावर कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी आज घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावर तातडीने हालचाली न झाल्यास ३१ मार्चला पूरग्रस्तच गाळ काढण्यासाठी नदीत उतरतील असा इशारा देत प्रशासनाला 'अल्टीमेटम' देण्यात आला.
घटप्रभा खोऱ्यातील नद्यांना वारंवार येणाऱ्या पुराबाबत उपाययोजना करण्यात यावेत, वर्षानुवर्ष नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे नद्यांची पात्रे उथळ झाली असून त्यामुळे थोड्याशा पावसाने देखील नदीचे पाणी पात्राबाहेर येते. त्यामुळे हा गाळ काढण्याची मोहीम शासनाने तातडीने हाती घ्यावी, २०१९ च्या पुराने महत्तम पूररेषा दाखवून दिली आहे. त्यानुसार तातडीने पूररेषा निश्चित करण्यात यावे, हिरण्यकेशी, ताम्रपर्णी नदी काठावर पुराच्या धोकापातळीत असलेल्या वस्त्या, गावे यांच्या पुनर्वसनाचा कालबद्ध कार्यक्रम तातडीने हाती घेण्यात यावा, पुरामुळे पाण्याखाली गेलेल्या पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी, आदी मागण्यासाठी गडहिंग्लज प्रांत कार्यालयावर घटप्रभा खोरे पूरग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या संदर्भात प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांच्याशी चर्चा करण्यात आली. विविध मागण्यांच्या निवेदनाकडे लक्ष वेधण्यात आले.
शासन दरबारी सातत्यपूर्ण लढाई लढू : अमर चव्हाण
यावेळी बोलताना माजी सभापती अमर चव्हाण म्हणाले, पुराची ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी शासन दरबारी सातत्यपूर्ण लढा द्यायचा आहे. २०१९, २०२१ व २०२४ यावर्षी आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे केले मात्र तुटपुंजी मदत दिली. कष्टाच्या तुलनेत ही मदत तोकडी आहे. शासनाने किमान मदत देताना तरी हात व मन उदार ठेवावे असे सांगून नाराजी व्यक्त केली. नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने दरवर्षी पूरस्थितीला जनतेला सामना करावा लागतो. शासनाने ३१ मार्चच्या आत याबाबत कार्यवाही न केल्यास गाळ काढण्यासाठी प्रत्यक्ष जनताच नदीत उतरेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
कायमस्वरूपी उपाययोजना करा, अन्यथा तीव्र आंदोलन : प्रा. सुनील शिंत्रे
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, पाऊस कमी होऊन देखील नद्यांना पूर येतो. यामागे विविध शास्त्रीय कारणे आहेत. नदीत साचलेला गाळाचा भराव हे एक प्रमुख कारण आहे. पाऊस व पूर आल्यानंतरच यावर चर्चा होते. पूर निघून गेल्यानंतर पूरग्रस्तांचे प्रश्न बाजूला पडतात. त्यामुळे यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याची आता गरज आहे. शासनाने याबाबत तातडीने कार्यवाही न केल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
पूरग्रस्तांसाठी लढा उभारू : राजेंद्र गड्यानावर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर म्हणाले, घटप्रभा खोऱ्यातील नद्यांना येणाऱ्या पुराची समस्या गंभीर आहे. त्याचा मोठा फटका येथील शेतकऱ्यांना नागरिकांना बसत आहे. हा एका दिवसात सुटणारा विषय नसून हा प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी आपल्याला हा लढा उभारावा लागेल. दरम्यान, घटप्रभा खोऱ्यातील पूर समस्येच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील पूर परिस्थितीचा अभ्यास करून उपाययोजना सुचवलेल्या शहानवाज शहा व श्री. महाडिक यांना खास या मोर्चावेळी राजेंद्र गड्यानावर यांनी पाचारण केले होते. यावेळी शहानवाज शहा यांनी याबाबत मार्गदर्शन केले.
अन्यथा ३१ मार्चला गाळ काढण्यासाठी पूरग्रस्तच नदीत उतरतील : नागेश चौगुले
मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, नद्यांमधील गाळामुळे दरवर्षी पूर परिस्थिती अधिकच गंभीर बनत चालली आहे. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे आता अधिकाऱ्यांच्याच पहिल्यांदा खुर्च्या उचलण्याची वेळ आली आहे. तातडीने याबाबत निर्णय घेऊन कार्यवाही न केल्यास ३१ मार्चला पूरग्रस्तच गाळ काढण्यासाठी नदीत उतरतील असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय देण्याची गरज : डॉ. रियाजभाई शमनजी
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी म्हणाले, दरवर्षी निर्माण होणाऱ्या पुराचा फटका गोरगरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. शासनाने हा प्रश्न शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून कायमस्वरूपी मार्गी लावून नदीकाठावरील शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय देण्याची गरज आहे. पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही शासन दरबारी लढा देऊ अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी माजी सभापती अमर चव्हाण, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख प्रा सुनील शिंत्रे, सहसंपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी, संपत देसाई, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दिलीप माने, शहर प्रमुख संतोष चिकोडे, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, अमृतराव शिंत्रे, रामराजे कुपेकर, मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, गोपाळराव पाटील, प्रा. किसनराव कुराडे, विद्याधर गुरबे, सरपंच अंकुश रणदिवे, रमजान अत्तार यांच्यासह विविध पदाधिकारी व पूरग्रस्त शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








