महागाव, उंबरवाडी, बेरडवाडी, चोथेवाडी, हसुरवाडी, हसुरसासगिरी परिसरात पावसाची 'मुसळधार'
ओढ्यांना पुन्हा एकदा आला पूर, वाहतुकीला काहीकाळ व्यत्यय
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आज दुपारी व सायंकाळी गडहिंग्लज तालुक्यात काही भागात मुसळधार पाऊस झाला. महागाव, उंबरवाडी, बेरडवाडी, चोथेवाडी, हसुरवाडी, हसुरसासगिरी परिसरात पावसाची पुन्हा एकदा 'मुसळधार' दिसून आली.
गडहिंग्लज - चंदगड राज्यमार्गावरील हुनगिनहाळ स्मशान शेड जवळील ओढ्यावर पाणी आल्याने काही काळ वाहतूक संथ गतीने सुरु होती. तसेच भडगाव (चोथेवाडी ) - बेरडवाडी ओढ्याजवळ देखील पाणी आल्याने येथेही वाहतुकीस व्यत्यय आला. त्यापाठोपाठ हसुरवाडी, हसुरसासगिरी या ठिकाणीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. ढगफुटीसदृश पाऊस झाला.
दरम्यान महागाव परिसरात देखील काल व आज (मंगळवार व बुधवार) सलग दोन दिवस पावसाने झोडपून काढले. त्यामुळे ओढ्या नाल्यांना पूर आला. महागाव- उंबरवाडी मार्गावरील ओढ्यावर पाणी आले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूकीला देखील काहीकाळ व्यत्यय आला होता. महागावसह उंबरवाडी परिसरातील विविध भागात जोरदार पाऊस झाला.




