उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे शिष्टमंडळाला आश्वासन
चंदगडचे आमदार राजेश पाटील यांच्या माध्यमातून निवेदन देत वेधले लक्ष
मुंबई : हिरण्यकेशी, ताम्रपर्णी, घटप्रभा नद्यांमधील गाळ काढण्यासाठी तत्वतः मान्यता मिळून देखील काही तांत्रिक अडचणीमुळे कार्यवाही होत नसल्याकडे चंदगड विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले. त्यांच्यासोबत पूर्व भागातील शिष्टमंडळ होते. या पार्श्वभूमीवर अजितदादांनी या संदर्भात संबंधित यंत्रणेला लवकरात लवकर कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना देण्यात येतील असे आश्वासन दिले.
मुसळधार पावसामुळे हिरण्यकेशी, ताम्रपर्णी व घटप्रभा या तीनही नद्या महापुराचे प्रलयंकारी रूप घेऊन वाहत आहेत. पण या प्रचंड महापुरासाठी नद्यांमध्ये वर्षानुवर्षे साचून राहिलेला गाळ हे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विधिमंडळाच्या दोन अधिवेशनामध्ये या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून या नद्यांमधला गाळ काढला जावा अशा प्रकारची जोरदार मागणी केलेली आहे. तथापि शासनाकडून गाळ काढण्याच्या निर्णयाला तत्वतः मान्यता मिळालेली आहे, परंतू या गाळ काढण्याच्या प्रक्रियेसाठी काही तांत्रिक अडचणी आहेत असे समजते, या तीनही नद्यांचा गाळ काढणे करिता संबंधित विभागाला सूचना कराव्या व आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आमदार राजेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे निवेदनातून केली.
या संदर्भातील संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना करून लवकरात लवकर कार्यवाही कार्यवाही केली जाईल असे आश्वासन ना. पवार यांनी यावेळी दिले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार मुन्नोळी, कोल्हापूर जिल्हा मजूर संघाचे संचालक दीपक पुजारी, वसंत चौगुले, युवा उद्योजक शिवकुमार संसुद्धी, बुगडीकट्टीचे सरपंच दयानंद देसाई, नौकुडचे सरपंच शुक्राचार्य चोथे, विक्रांत नाईक, भरत झळके उपस्थित होते.




