जलसमर्पण आंदोलनाने प्रशासनाची उडाली तारांबळ
संयुक्त बैठकीच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हिरण्यकेशी नदी प्रदूषण मुक्तीसाठी गडहिंग्लज तालुक्यातील नांगनूर येथील बंधाऱ्यावरून १३ आंदोलकांनी नदीत उड्या मारत जलसमर्पण आंदोलन केले. या प्रश्नी कोल्हापूर व बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची येत्या आठ दिवसात संयुक्त बैठक घेण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
नांगनूर येथे हिरण्यकेशी नदीत कर्नाटकातील संकेश्वर साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी व संकेश्वर नगरपालिकेचे सांडपाणी मिसळत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होत आहे. यामुळे नांगनूर, कडलगे, अरळगुंडी, खणदाळ या गावच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी सभापती अमर चव्हाण, शाहू मोकाशी यांच्या नेतृत्वाखाली जलसमर्पण आंदोलन करण्यात आले. सकाळी साडे अकराच्या दरम्यान आंदोलकांनी बंधाऱ्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. सदर आंदोलनस्थळी चर्चेसाठी मंडल अधिकारी प्रवीण कदम, तलाठी संगीता चौगुले, ग्राम विकास अधिकारी पी बी पाटील, पोलीस पाटील ज्ञानदेव मोकाशी, पोलीस हवालदार पांडुरंग कुंभार उपस्थित होते. पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
मात्र प्रांताधिकारी व तहसीलदार चर्चेसाठी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असे अमर चव्हाण, कॉम्रेड संपत देसाई, कॉम्रेड संजय तर्डेकर यांनी सांगितले. मात्र सोमवारी राष्ट्रपती कोल्हापूर दौऱ्यावर असल्याने अधिकाऱ्यांना उपस्थित राहणे शक्य होणार नसल्याचा निरोप येताच आंदोलक आक्रमक झाले. तेरा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत नदीत उड्या मारल्या. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली. त्यानंतर पोहत येऊन आंदोलकांनी पुन्हा बंधाऱ्यावर ठिय्या मारला. महिलाही नदीच्या दिशेने जाऊ लागल्याने पोलिसांनी त्यांना अडवत माघारी परतविले.
यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, सीमा मोकाशी, नरेवाडीचे सरपंच अंकुश रणदिवे, अमृतराव शिंत्रे, बाळगोंडा पाटील, चेतन लोखंडे, कडलगेचे उपसरपंच आनंदराव जाधव, विनोद मोकाशी, संजय मोकाशी, राजू मोकाशी, आप्पासाहेब मोकाशी, नागराज जाधव, रमेश पाटील, दीपक सनदी, आर. के. यादगुडी, राजश्री नार्वेकर, नजमा मुत्नाळे यांच्यासह नांगनूर, कडलगे, अरळगुंडी, खणदाळ येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





