जनतेने त्यांना पुन्हा संधी दिल्यास गडहिंग्लज विभागातील सर्व मंदिरांचा ते नक्कीच विकास करतील!
महागाव येथील कार्यक्रमात गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केला विश्वास
आमदार राजेश पाटील यांचा जनतेच्या वतीने करण्यात आला भव्य नागरी सत्कार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राजेश पाटील यांनी राजकारण बाजूला ठेवून चंदगड विधानसभा मतदारसंघातील विविध यात्रा स्थळे व मंदिरांच्या विकासासाठी कोट्यवधीचा विकास निधी उपलब्ध करून दिला. एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास कामे करून देखील त्या कामांचे श्रेय त्यांनी कधी घेतले नाही. कर्तव्य म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे काम करत जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या. जनतेने त्यांना पुन्हा संधी दिल्यास गडहिंग्लज विभागातील सर्व मंदिरांचा ते नक्की विकास करतील असा विश्वास नूल येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी यांनी व्यक्त केला.
गडहिंग्लज तालुक्यातील महागाव येथे आमदार राजेश पाटील यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांतील १३ मंदिरांना 'क' वर्ग यात्रास्थळाचा दर्जा आणि ५ वर्षांत १६०० कोटींची विकासकामे केल्याबद्दल आमदार राजेश पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना गुरुसिद्धेश्वर महास्वामीजी पुढे म्हणाले, आमदार राजेश पाटील यांनी सोळाशे कोटी रुपयांची विविध विकास कामे करून देखील त्याचे त्यांनी श्रेय कधी घेतले नाही. नूल येथील मठाला देखील त्यांनी कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यांनी निधी दिला म्हणून या कार्यक्रमाला आलेलो नाही तर आमदार पाटील यांनी पक्षाचा झेंडा व चिन्ह बाजूला ठेवून मठाचा शिष्य म्हणून त्यांनी हा कार्यक्रम घेतला आहे त्यामुळे आपण त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचे नमूद करून जनतेने त्यांना पुन्हा संधी दिल्यास चंदगड मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार राजेश पाटील म्हणाले, चंदगड विधानसभा मतदारसंघातील जनतेने मला तळ हातावरील फोडाप्रमाणे जपले आहे. गेली पाच वर्ष मला साथ देत पाठबळ दिले आहे. येथील जनतेच्या पाठबळामुळेच विकास कामांच्या माध्यमातून त्यांच्या अपेक्षा मला पूर्ण करता आल्या. येथील जनतेने मला पुन्हा संधी दिल्यास एक कार्यकर्ता, लोकसेवक म्हणून मी काम करेन असा विश्वास त्यांनी जनतेला दिला. यावेळी त्यांनी व्यासपीठावर नतमस्तक होऊन कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व जनतेला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनःपूर्वक नमस्कार केला.
यावेळी बोलताना जयसिंग चव्हाण म्हणाले, आमदार राजेश पाटील हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना जपणारे आमदार आहेत. वादळालाही टक्कर देण्याची त्यांची तयारी आहे. मतदार संघातील प्रत्येक गावागावाचा विकास हाच त्यांचा ध्यास आहे. अशा या जनतेच्या मनातील आमदाराला आम्ही प्रसंगी आमच्या छातीचा कोट करून जपू असा शब्द त्यांनी जनतेच्या वतीने आमदार पाटील यांना दिला.
यावेळी रामाप्पा करिगार, अभय देसाई, जयकुमार मुन्नोळी, भिकू गावडे, जयसिंग चव्हाण, भरमाण्णा गावडा, संतोष पाटील, शिवकुमार संसुद्धी, लक्ष्मण तोडकर, महाबळेश्वर चौगुले, शिवानंद हुंंबरवाडी, अनिकेत कोणकेरी, आप्पासाहेब देसाई, जानबा चौगुले, शिवाजी नांदवडेकर, बाळासाहेब मोर्ती आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





.jpg)

.jpg)