शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत नाव नाही
अधिकृत उमेदवारी कोणाला ? उत्सुकता ताणली
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफुशीमुळे या मतदारसंघात अद्याप अधिकृतरित्या उमेदवाराची घोषणा केली नसल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या नावाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या निवडणुकीत चंदगड विधानसभा मतदारसंघातील लढती या बहूरंगी व रंगतदार होणार याचे चित्र आता स्पष्टपणे दिसू लागले आहे. महायुतीतून अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी मिळाली असली तरी गेल्या निवडणुकीत थोडक्या मताने पराभव झालेले भाजपचे नेते शिवाजीराव पाटील हे देखील महायुतीतूनच सुरुवातीपासूनच इच्छुक होते. या संदर्भात पक्ष श्रेष्ठींची भेट घेऊन त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र विद्यमान आमदारांना उमेदवारी या महायुतीच्या फार्मल्यानुसार आमदार राजेश पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे भाजपचे शिवाजीराव पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे भाजपचेच नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघात महायुतीत बंडाचे निशाण पहायला मिळत आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चंदगड विधानसभा मतदारसंघाची जागा ही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. त्यामुळे माजी सहकार मंत्री व माजी विधानसभा अध्यक्ष स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांच्या कन्या डॉ. नंदाताई बाभुळकर या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. तशी मोर्चेबांधणी देखील त्यांनी सुरुवातीपासूनच सुरू केली आहे. मात्र महाविकास आघाडीतूनच खुद्द शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अमर चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे विद्याधर गुरबे, गोपाळराव पाटील, विनायक उर्फ अप्पी पाटील, ठाकरे पक्ष शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सह संपर्कप्रमुख डॉ. रियाजभाई शमनजी यांनी नंदाताईंच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. वरिष्ठ स्तरावरील नेते मंडळींची भेट घेऊन याबाबत सर्वांनी चर्चा देखील केली आहे.
दरम्यान, नुकतेच महागाव येथील अनिकेत सभागृहात महाविकास आघाडीच्या या पदाधिकाऱ्यांनी नंदाताई बाभुळकर यांना वगळून कार्यकर्ता संवाद मेळावा घेतला आहे. नंदाताईंना वगळून येथे उपस्थित व्यासपीठावरील कोणालाही उमेदवारी द्यावी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू अशी जाहीर भूमिका या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने चंदगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे या सर्वांचा विरोध डावलून डॉ. नंदाताई बाभुळकर यांना उमेदवारी देणार की अन्य कोणाला उमेदवारी मिळणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. काल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे, मात्र या यादीत चंदगडचा समावेश नसल्याने आणखी उत्सुकता ताणली गेली आहे.

