Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

भडगाव येथील शाळेला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट

मतदान केंद्रे, सोयी सुविधांबाबत घेतली माहिती  


इयत्ता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांशीही साधला संवाद 


शालेय पोषण आहार, दप्तराचे ओझे याबाबत विद्यार्थ्यांकडून घेतली माहिती



भडगाव : विद्यार्थ्यांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी अमोल येडगे. यावेळी उपस्थित प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके.


गडहिंग्लज (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भडगाव येथील प्राथमिक शाळेला बुधवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देत मतदान केंद्रे, सोयी सुविधांबाबत शिक्षकांकडून माहिती घेतली. त्याचबरोबर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद देखील साधला.



राज्यात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्वाधिक मतदान केंद्रे असणाऱ्या गावांना जिल्हाधिकारी अमोल येडगे भेट देऊन मतदान केंद्राबाबत माहिती घेत आहेत. या पार्श्वभूमीवर  गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथील शाळेला त्यांनी भेट देत येथील मतदान केंद्रांवरील सुविधांबाबत सविस्तर माहिती घेतली. यावेळी केंद्रप्रमुख महारुद्र हुक्केरी यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे  स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेतील वर्ग खोल्यांची माहिती घेतली. मतदान केंद्रांवर दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.



विद्यार्थ्यांशीही साधला संवाद 


मतदान केंद्रांच्या पाहणी बरोबरच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी इयत्ता पाचवीच्या वर्गाला भेट देत विद्यार्थ्यांशीही मनमोकळेपणाने संवाद साधला. दप्तरांचे ओझे, शालेय पोषण आहार याबाबत विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले. दप्तराचे ओझे कमी आहे की नाही, शासनाने आता पुस्तकाचे ओझे कमी करण्यासाठी एकच पुस्तक काढले आहे ते आवडते की नाही, पुस्तकात नोंदी करण्यासाठी 'माझी नोंद' साठी विद्यार्थ्यांना एक पान रिकामे दिलेले आहे त्या नोंदी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत का?, अभ्यासक्रम आवडतो की नाही, शालेय पोषण आहारातील मेनू व तो आवडतो की नाही आदी प्रश्न विद्यार्थ्यांना विचारत त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शनही केले.



यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, गडहिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेत शेळके, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, तलाठी  सौ. रूपाली कांबळे, ग्रामसेवक दत्तात्रय वायदंडे, कृषी सहाय्यक अनिल कांबळे, हरिदास भोंगे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामाप्पा करीगार, रविशंकर बंदी, सचिन विभुते, पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक, केंद्रप्रमुख महारुद्र हुक्केरी, जयश्री भुसुरी, अण्णासाहेब गजबर, जयश्री मोहिते, लीलाताई चौगुले, अनुराधा क्षीरसागर, तानाजी पाटील, हनुमंत सुळेभावेकर, सुरेखा माने यांच्यासह सर्व बीएलओ अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.


भडगाव : निवडणूक आयोगाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल यांनी देखील भडगाव शाळेला भेट दिली. यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके व इतर. 


दरम्यान, आज पुणे येथील निवडणूक आयोगाच्या उपायुक्त वर्षा उंटवाल यांनी देखील भडगाव शाळेला भेट दिली. त्यांनी देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांची माहिती घेतली. त्यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेतील डिजिटल क्लासरूमला भेट देत विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारले. यावेळी तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.






Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.