चंदगड विधानसभा मतदारसंघात बहुरंगी लढतीची चिन्हे
गडहिंग्लज (प्रतिनिधी): चंदगड विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दररोज नवीन ट्विस्ट पाहण्यास मिळत आहेत. काल अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले दौलत साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव खोराटे यांना जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आतापर्यंतचे चित्र पाहता या मतदारसंघात बहुरंगी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आतापर्यंत चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतून डॉ. नंदाताई बाभूळकर, अपक्ष म्हणून शिवाजीराव पाटील, संग्रामसिंह कुपेकर, मानसिंगराव खोराटे, महाविकास आघाडीतून बंड करत विनायक उर्फ अप्पी पाटील व गोपाळराव पाटील यांनी अर्ज दाखल केले आहेत. आज महायुतीचे उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मानसिंगराव खोराटे यांनी जनसुराज्य पक्षातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकंदरीत चंदगड विधानसभा मतदारसंघात दोन्हीही आघाड्यांमधील उमेदवारांना बंडखोरांचा सामना करावा लागणार आहे.

