गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात महिला सबलीकरण व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने गडहिंग्लज व शहर परिसरातील खेड्यापाड्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्व:कर्तृत्वावर उल्लेखनीय कार्य केलेल्या नेत्ररोग तज्ञ डॉ.अस्मिता पाटणे-चौहान, उद्योजिका अॅड.अनिता भाऊ पाटील, अभिनेत्री उर्मिला कदम, सर्पमित्र सलमा सनदी, पत्रकार लता पालकर, नूलच्या सरपंच सौ. प्रियांका यादव, आशा सेविका सौ. सुधा जाधव, बचत गट प्रमुख सोनाली जाधव आदींचा कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी साखर कारखान्याच्या माजी संचालिका सौ.क्रांतीदेवी कुराडे यांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते तर संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या सन्मान सोहळ्यात प्रारंभी प्रा. सौ.पौर्णिमा पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी साखर कारखान्याच्या माजी संचालिका सौ.क्रांतीदेवी कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये - महिला या निसर्गत: सक्षम असतात. महिलांनी स्वत:चे संरक्षण करणे आवश्यक आहे. आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. शिक्षणामुळे महिलांना आपल्या कर्तृत्वातून सिद्ध होण्याची ताकद प्राप्त झाली असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष दिग्विजय कुराडे यांनी आपल्या भाषणातून आज नऊ महिलांचा जो सन्मान केला त्या सर्वच प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत. त्यांनी केलेल्या कार्याची प्रेरणा महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीनी घ्यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नेत्ररोग तज्ञ डॉ.अस्मिता पाटणे-चौहान, उद्योजिका ॲड. अनिता भाऊ पाटील, अभिनेत्री उर्मिला कदम, सर्पमित्र सलमा सनदी, पत्रकार लता पालकर, नूलच्या सरपंच सौ.प्रियांका जाधव, आशा सेविका सौ. सुधा जाधव, बचत गट प्रमुख सोनाली जाधव यांनी आपल्या आजपर्यंतच्या प्रवासातील आलेले अनुभव सांगून सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या सन्मान सोहळ्याचे संयोजन शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्रा.विश्वजित कुराडे, प्रा. सौ.पौर्णिमा पाटील, डॉ.श्रद्धा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आशा पाटील यांनी केले तर आभार डॉ. श्रद्धा पाटील यांनी मानले. सर्व प्राध्यापिका, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.




