उत्तूरच्या निर्मिती मंडळाने दिले स्वसंरक्षणाचे धडे
आजरा : शाळकरी मुली आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन निर्मिती मंडळाने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून 'मी आदिशक्ती' या उपक्रमाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने उत्तूर येथील वसंतरावदादा पाटील विद्यालयाच्या मैदानावर ५० विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. तीन दिवस चाललेल्या शिबिरात कोल्हापूरचे इतिहास अभ्यासक विनय चोपदार यांनी मुलींना आत्मसंरक्षणाचे तंत्र शिकवले. या उपक्रमामुळे मुलींचे आत्मबल आणिआत्मविश्वास वाढण्यास मदत झाली.
'मी आदिशक्ती' या उपक्रमात समोरची व्यक्ती कशी ओळखावी, नियमित कामांमधूनच व्यायाम व स्वसंरक्षणाचे धडे, प्रवासातील संरक्षण, मार्शल आर्ट मधील सोपी तंत्रे, आपल्याकडे असणाऱ्या रुमाल, ओढणी, पर्स, पिन, नेलकटर आदी वस्तूच्या सहाय्याने संरक्षण कसे करावे हे विनय चोपदार यांनी प्रात्यक्षिकांसह शिकविले. शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता पुढील वर्षी विविध शाळांमध्ये आणि महिलांसाठी नऊ दिवस शिबीर घेण्याचा मानस मंडळाचे अध्यक्ष महादेव मिसळ यांनी व्यक्त केला. उत्तूरचे सरपंच व मंडळाचे उपाध्यक्ष किरण आमणगी, सचिव चंद्रशेखर आमणगी, सौरव वांजोळे, सुरेश कांबळे, अस्मिता गुरव, विजय पाकले यांनी उपक्रमाचे संयोजन केले.

