Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज विभागासाठी ५ टीएमसी पाणी मंजूर करावे!

'सारथी'चे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 


गडहिंग्लज, आजरा, चंदगड भागातील जनतेच्या मांडल्या समस्या 





गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज, आजरा, चंदगड विभागात निसर्गाचा समतोलच बिघडल्याने येथील जनतेला कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात येथील शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाल निघण्यासाठी गडहिंग्लज विभागासाठी ५ टीएमसी पाणी मंजूर करण्यात यावे अशी मागणी सारथी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनातून केली आहे. 



या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्हातील घटप्रभा खोऱ्यासाठी १९७२ साली कृष्णा, गोदा, लवाद मंडळाने ७ टीएमसी पाणी मंजूर केले होते. गडहिंग्लज, आजरा, चंदगड या विभागात मंजूर पाण्यापैकी बहूतांशी प्रकल्प पूर्णत्वास गेले आहेत. अजूनही काही प्रकल्प पूर्ण व्हावयाचे आहेत. या विभागाचा विचार करताना पूर्वीपासून आजरा, चंदगड परिसरात विक्रमी पाऊस पडायचा परंतू अलिकडे पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने पावसाचे वेळापत्रक बदलले आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ. अलिकडे गेल्या ५ वर्षात तर वाढत्या तापमानामुळे अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले आहे. ही पार्श्वभूमी थोडीशी लक्षात घेतली तर या विभागासाठी भविष्यकालीन ५० वर्षाचा विचार करून आणखी ५ टीएमसी पाण्याची गरज आहे. हा प्रश्न गेल्या दशकभरापासून लोकप्रतिनिधीनी विधानसभेत आणि प्रशासनाच्या स्तरावर वारंवार मांडलेला आहे.



५ वर्षापूर्वी कृष्णा खोरे मंडळाची बैठक गडहिंग्लज येथे झाली होती. या बैठकीत हा प्रश्न चर्चेला आला होता. तत्कालीन आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर यांनी हा प्रश्न मांडून महामंडळाचे लक्ष वेधले होते. विद्यमान आमदारांनी या प्रश्नांवर शासनाकडे पाठपूरावा सुरू ठेवला आहे. या नव्या ५ टीएमसी पाण्यातून होणाऱ्या प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ कर्नाटक सीमा भागासाठी होणार असल्याने कर्नाटकच्या सहकार्याने हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कर्नाटक शासनाशी चर्चा झाली आहे.



कृष्णा, गोदा लवाद मंडळाने महाराष्ट्राला मंजूर केलेल्या पाण्यापैकी ८१ टीएमसी पाणी अद्याप शिल्लक आहे. याच पाण्यातील ५ टीएमसी पाणी गडहिंग्लज विभागासाठी मंजूर करावे म्हणजे या विभागाचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी निकाली निघणार आहे. शेती आणि पिण्याचा पाण्याचा भविष्यकालीन विचार करताना. नव्याने ५ टीएमसी पाण्याचे प्रकल्प येत्या ५ वर्षांत पूर्ण होणे आवश्यक आहे. याबाबत संबंधित खात्याला सुचना देऊन नेमकी वस्तूस्थिती जाणून घ्यावी व आवश्यक ते निर्देश द्यायावेत अशी विनंती गडहिंग्लज, आजरा, चंदगड विभागातील जनतेच्यावतीने अध्यक्ष प्रा. शिंत्रे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.