Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गेले कित्येक वर्ष प्रलंबित विविध प्रश्न सोडवण्याचे नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासमोर आव्हान

गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यातील जनतेकडून अपेक्षा 





गडहिंग्लज (संतोष नाईक): गेले महिनाभर विधानसभा निवडणुकीची सुरू असलेली रणधुमाळी एकदाची आता शांत झाली आहे. पंधरा वर्षाच्या इतिहासात चंदगड विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल हा धक्कादायक लागला. येथील जनतेने भाजपचे नेते व अपक्ष उमेदवार शिवाजीराव पाटील यांना पसंती दिली. त्यांना 24 हजाराचे मताधिक्यही दिले. त्यामुळे नूतन आमदार श्री. पाटील यांच्यावर या मतदारसंघातील वर्षानुवर्षे न सुटलेले काही प्रमुख प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आव्हान आहे. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या कार्यकाळात तरी हे प्रश्न सुटतील का? हे आता पहावे लागणार आहे.



या मतदारसंघातील गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील जनतेला सतत सतावणारा प्रश्न म्हणजे ग्रामीण भागातील अपुऱ्या एसटी सेवेचा. कारण या तीनही आगारात प्रवासी संख्या पाहता उपलब्ध गाड्या अपुऱ्या पडत आहेत. केवळ लांब पल्ल्याच्या शहरी मार्गांकडेच जास्त उत्पन्न मिळवायच्या नादात ग्रामीण प्रवाशांकडे मात्र कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या नादुरुस्त गाड्यांमुळे प्रवाशांचे होणारे हाल हे न सांगण्या पलीकडचे आहे. आज ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी एसटीने प्रवास करतात. मात्र कोरोना काळानंतर निर्माण झालेली एसटी बसची ही समस्या अद्याप कायम आहे. विविध पक्ष संघटना यांच्या माध्यमातून आंदोलने केली गेली मात्र आश्वासना पलीकडे पदरात काहीच पडलेले दिसत नाही. त्यामुळे या आगारांमध्ये पुरेशा प्रमाणात गाड्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे हा प्रश्न नूतन आमदारानी प्राधान्याने सोडवण्याची गरज आहे. 



त्याचबरोबर या मतदारसंघातील आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पूल. गडहिंग्लज, चंदगड, कोकण,  गोव्याला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र पूरस्थितीमुळे हा पूल दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातो. कधी दोन, कधी तीन  तर आठवडाभरही हा पूल पाण्यात असतो. त्यामुळे तालुक्याच्या निम्म्या ग्रामीण भागाचा गडहिंग्लजशी संपर्कच तुटतो. जनजीवनच विस्कळीत बनते. नोकरदार, शेतकरी, विद्यार्थी यांना मोठ्या गैरसोयीला तोंड द्यावे लागते. हा प्रश्न गेली कित्येक वर्ष प्रलंबित आहे. केवळ पावसाळा आला की या प्रश्नावर चर्चा होते. पावसाळा संपला की हा प्रश्न मागे पडतो. यावर्षी तर निवेदने देऊन व आंदोलने करून कंटाळलेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी आक्रमकपणे आंदोलन करत कोणत्याही परिस्थितीत 2025 मध्ये या पुलाचे काम झालेच पाहिजे अशी टोकाची भूमिका घेतल्याने प्रशासनाने प्राथमिक हालचाली तरी सुरू केल्या आहेत. प्रशासनाने नव्या पुलासाठी सर्वे केला आहे. असे असले तरी प्रभावी पाठपुरावा करून हा प्रश्न वेळीच मार्गी लावण्याची गरज आहे. त्याचबरोबर हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी नदीपात्रांमधील गाळाचा प्रश्न देखील ऐरणीवर आहे. गाळामुळे दरवर्षी महापुराचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यामुळे हा प्रश्न देखील प्रभावीपणे मांडून संपुष्टात आणणे फार महत्त्वाचे आहे. 


तसेच या हिरण्यकेशी नदीवरील जरळी, निलजी या दोन बंधाऱ्यांवरील नव्या पुलांना मंजुरी मिळून देखील कार्यवाहीची प्रक्रिया प्रलंबितच आहे. केवळ कागदी घोडे नाचविण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची गरज आहे. या दोन्ही बंधाऱ्यावरून गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. त्यामुळे या दोन्ही पुलांचा प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची गरज आहे. 



हिरण्यकेशी नदीसंदर्भातीलच आणखी एक अत्यंत महत्त्वाचा  प्रश्न म्हणजे नांगनूर येथील हिरण्यकेशीच्या दूषित पाण्याचा प्रश्न होय. कर्नाटकातील संकेश्वर शहरातील सांडपाणी  व साखर कारखान्याचे दूषित पाणी या नदीत मिसळत असल्याने गेले कित्येक वर्ष येथील नागरिक यासाठी लढा देत आहेत. या दूषित पाण्यामुळे येथील नागरिकांचे  व जनावरांचे देखील आरोग्य धोक्यात आले आहे. विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने केली. प्रसंगी या नदीत उड्या मारून जलसमाधी सारखे तीव्र आंदोलने देखील झाली, मात्र हा प्रश्न सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. येथील नागरिकांना हा प्रश्न सुटण्यासाठी आणखी किती दिवस वाट पहावी लागणार? अशी विचारणा होताना दिसत आहे. त्यामुळे हा देखील ऐरणीवरचा प्रश्न प्रामुख्याने सोडवण्याची गरज आहे.



आणखी एक सर्वात महत्त्वाचा व वारंवार सतावणारा प्रश्न म्हणजे बेरोजगारीचा. कारण चंदगड विधानसभा मतदारसंघातील चंदगड हलकर्णी व गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील औद्योगिक वसाहतींमध्ये नवे उद्योग आणून येथील बेरोजगारांच्या हाताला काम देणे अत्यंत गरजेचे आहे. या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये नवे उद्योग आल्यास या भागातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यास मदत होईल. अन्यथा येथील तरुणांना पुणे, मुंबई शिवाय पर्याय राहणार नाही. त्याचबरोबर चंदगड तालुक्यातील काही दुर्गम वाड्यावास्त्यांवर रस्त्यांअभावी येथील रहिवाशांचे प्रचंड हाल होतात. वयोवृद्ध, रुग्ण, महिलांना प्रसूतीसाठी रात्री-अपरात्री रुग्णालयात नेणे मोठ्या अडचणीचे ठरते. त्यामुळे अशा दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवर पक्के रस्ते होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.    



तसेच तिन्ही तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले, निसर्गरम्य ठिकाणे यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. या माध्यमातून पर्यटनाचा विकास करून यातून रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्या तरी वारंवार चर्चेत असणारे हे प्रमुख प्रश्न येत्या पाच वर्षात मार्गी लावण्याचे आव्हान नूतन आमदार शिवाजीराव पाटील यांच्यासमोर असणार आहे. येथील जनतेच्या देखील त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आता येथील जनतेने त्यांना आमदार करून पुन्हा बळ दिल्याने गेले कित्येक वर्ष प्रलंबित असणारे हे सर्व प्रश्न सोडवण्यात ते कितपत यशस्वी ठरतात हे पाहावे लागणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.