साताऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मोठ्या कारवाईने राज्यात खळबळ
सातारा : साताऱ्यात चक्क न्यायाधीशांवरच पाच लाखाच्या लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईनंतर न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार तरुणीच्या वडिलांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. यामध्ये त्यांना अटकही झाली होती. त्यामुळे तक्रारदार तरुणीचे वडील सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी सातारा जिल्हा सत्र न्यायालयात जामण्यासाठी अर्ज दाखल केला होता. हा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश निकम यांच्याकडे प्रलंबित असून हा जामीन अर्ज मंजूर करण्यासाठी न्यायाधीशांच्या सांगण्यावरून आनंद खरात व किशोर खरात यांनी पाच लाख रुपयांची लाच तक्रारदाराकडे मागितली होती. याप्रकरणी तक्रारदार तरुणीने पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीचे पडताळणी केल्यानंतर पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे कारवाईसाठी सापळा रचण्यात आला होता. सातारा जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातच असलेल्या एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

