Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

नेसरीतील बेशिस्त वाहतुकीला शिस्त कधी आणणार !

ग्रामपंचायतीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला निवेदन 


कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी 


अन्यथा गाव बंद आंदोलन करण्याचा दिलाय इशारा 





गडहिंग्लज (प्रतिनिधी):  नेसरी येथील बेशिस्त वाहतुकीला शिस्त आणण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला दिलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करावी अन्यथा गाव बंद आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. 



या निवेदनात म्हटले आहे की, नेसरी हे गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तिन्ही तालुक्याचे व सिमाभागाचे मध्यवर्ती केंद्र आहे. नेसरीसह परिसराचा विस्तार झपाट्याने वाढत आहे. ३५ ते ४० खेडापाड्यांची बाजारपेठ असणाऱ्या या नेसरीत अनेक शासकीय, निमशासकीय, शाळा, महाविद्यालय तसेच बँका, पतसंस्था व अन्य कार्यालये असल्याने या ठिकाणी कामानिमित्त दररोज येणाऱ्यांची संख्या व वाहतूक मोठ्या प्रमाणात असते.



नेसरीचा आठवडी बाजार दर गुरुवारी भरतो. या बाजाराच्या निमित्ताने व्यापारी, विक्रेते व ग्राहक यांची येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे गावात होणारी वाहतूक कोंडी, भरधाव जाणारी वाहने, बसस्थानकावर अवास्तव्य लागणारी वाहने यामुळे येथील वाहतूक पुन्हा बेशिस्त होते. याबाबत वारंवार नेसरी पोलिस ठाण्याचे अधिकारी व वरिष्ठांना तोंडी व लेखी निवेदन देवून  कायमस्वरूपी वाहतूक पोलीस नेमून या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी अशी मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.



एखादा मोठा अपघात अथवा अनर्थ घडल्यावरच पोलिसांना जाग येणार का? असा सवाल सर्वसामान्य नागरिक व इथल्या बसस्थानक परिसरातील दुकानदारांना पडल्याचे देखील या निवेदनात नमूद केले आहे. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नेमणूक करून वाहतुकीला शिस्त आणावी, अन्यथा गाव बंद ठेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामपंचायतीने या निवेदनातून दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.