नववर्षानिमित्त नाट्य रसिकांना मिळाली नाटकाची मोफत मेजवानी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवलेल्या 'आणि कुंभारचं काय झालं? या दोन अंकी नाटकास गडहिंग्लजकरांनी उदंड प्रतिसाद देत नाटकाचा आस्वाद घेतला. गडहिंग्लज नगरपरिषद आणि गडहिंग्लज कला अकादमीच्या कलाकारांनी नाटक अत्यंत प्रभावीपणे सादर करत गडहिंग्लजकरांची मने जिंकली.
नववर्ष आणि केदारी रेडेकर आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित आणि कुंभाराचं काय झाल? या नाट्यप्रयोगाचे गडहिंग्लज येथे मोफत आयोजन करण्यात आले होते. गडहिंग्लजमधील जनता खुले नाट्यगृह येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन केदारी रेडेकर संस्था समुहाच्या अध्यक्षा श्रीमती अंजनाताई रेडेकर, उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, प्राचार्या शिवानी गवंडे, गडहिंग्लज प्रेस क्लबचे पत्रकार जगदीश पाटील, नाटकाचे लेखक जयसिंग पाटील, नाट्य दिग्दर्शक किरणसिंह चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज पुजन करून करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दिग्दर्शक प्रा. शिवाजी पाटील म्हणाले, कला अकादमीच्या माध्यमातून बाल कलाकार, स्थानिक कलाकार यांना विविध ठिकाणी कला क्षेत्रात संधी दिली जात आहे. वर्धापन दिनानिमित्त नाट्य प्रयोगाचे आयोजन करून आयोजकांनी कला अकादमीच्या कलाकारांना पाठबळ दिले आहे. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीमती अंजनाताई रेडेकर म्हणाल्या, केदारी रेडेकर फौंडेशनच्या माध्यमातून अनेक वर्ष जानेवारी नववर्षाला गडहिंग्लजकरांना सांकृतिक मेजवानी दिली जात होती. कला अकादमीच्या या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून ही परंपरा पुन्हा सुरु झाली आहे. केदारी रेडेकर महाविद्यालयाच्या माध्यमातून विविध शासकीय आरोग्य योजना राबवून सर्वसामान्यांना जास्तीत जास्त लाभ देयाचा प्रयत्न करत आहोत. गडहिंग्लज कला अकादमीच्या २० कलाकारांनी आणि कुंभाराचं काय झालं? हे दोन अंकी नाटक अत्यंत प्रभावीपणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, अभिनय या सर्वच पातळीवर नाटक प्रभावी होते. या नाटकाचे दिग्दर्शन प्रा. शिवाजी पाटील यांनी केले होते. यावेळी केदारी रेडेकर संस्था समुहाचे पदाधिकारी प्राध्यापक, कर्मचारी, नाट्यरसिक उपस्थित होते .सूत्रसंचलन राजश्री कोल्हे तर आभार मयक कुरुंदवाडकर यांनी मानले.


