गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएनशनतर्फे ११ ते १२ जानेवारी अखेर ‘एमआर – युनायटेड’ ट्रॉफी शालेय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तेरा वर्षाखालील गटासाठी ही स्पर्धा आहे. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे.
चांगले खेळाडू घडण्यासाठी बालपणीच अधिक सामने खेळण्याची संधी द्यावी अशी सुचना जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला (एआयएफएफ) केली आहे. त्यासाठी १३, १५ आणि अठरा वर्षाखालील इंडियन लीग फुटबॉल स्पर्धा ‘एआयएफएफ’ने सुरु केली. त्या धर्तीवर या विभागातील हजारो खेळाडू घडविणा-या महाराणी राधाबाई हायस्कूलचे (एम. आर.) शतकमहोत्सवी गतवर्षापासून ही स्पर्धा सुरु करण्यात आली. स्पर्धेत शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन युनायटेड फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ रविंद्र हत्तरकी, उपाध्यक्ष सुरेश कोळकी आणि ‘एमआर’चे प्राचार्य संजय कुंभार यांनी केले आहे.
एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर दोन दिवस हि स्पर्धा होईल. नाईन साईट बाद पध्दतीने स्पर्धा होईल. खेळाडूंची शारिरीक क्षमता लक्षात घेऊन मैदानाचा आकार लहान ठेवण्यात येणार आहे. सन २०१२ किंवा त्यानंतरचा जन्म झालेला विदयार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. विजेत्या आणि उपविजेत्या संघासह सहा वैयक्तीक बक्षिसे आहेत. शनिवारी दुपारी एक वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. रविवारी दुपारी उपांत्य फेरीचे तर सायंकाळी अंतिम सामना होणार आहे. स्पर्धा समन्वयक रोहित साळूंखे आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.

