शेतकरी सभासदांच्या वतीने चंद्रकांत सावंत यांची महाराष्ट्राचे महाधिवक्ता यांच्याकडे मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहाराची सहकार कायद्यान्वये चौकशी करण्याचे साखर सहसंचालकांनी दिलेले आदेश रद्द करण्यात यावे अशी रिट याचिका तत्कालीन चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तथापि सदर याचिकेमध्ये तथ्य नसून ती फेटाळण्यात यावी अशी मागणी कारखान्याचे शेतकरी सभासद चंद्रकांत सावंत ( कसबा नूल) यांनी महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्रातून केली आहे.
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यातील २९.७८ कोटी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेबाबत तत्कालीन चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर व इतर यांच्या विरोधात विशेष लेखापरीक्षकामार्फत चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी साखर आयुक्त पुणे, साखर सहसंचालक कोल्हापूर व पंतप्रधान कार्यालयाकडे शेतकरी सभासद चंद्रकांत विठोबा सावंत यांनी कारखान्याच्या 25 हजार सभासदांच्या वतीने केली होती. सदर तक्रारीत तथ्य आढळल्याची खात्री झाल्याने त्यावर कायदेशीर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजीच्या साखर सहसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 88ची कारवाई करण्याची कार्यवाही सुरू आहे. यानुसार कारखान्यातील आर्थिक अनियमितेला जबाबदार संबंधित पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर नाव रकमेनिशी जबाबदारी निश्चित करण्याची कार्यवाही नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांमार्फत सुरू आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर तत्कालीन चेअरमन डॉ. शहापूरकर यांनी साखर सहसंचालकांनी दिलेले आदेश रद्द करण्यात यावेत अशी मागणी करणारी रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. मात्र या रिट याचिकेमध्ये तथ्य नसून ती रद्द करण्यात यावी व साखर सहसंचालकांचा आदेश कायम ठेवण्यात यावा अशी मागणी शेतकरी सभासद चंद्रकांत सावंत यांनी महाराष्ट्राचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांच्याकडे इ मेलद्वारे केली आहे.
पंचवीस हजार सभासदांच्या हितासाठी लढणार : चंद्रकांत सावंत
साखर कारखान्याचे 25 हजार सभासद, कामगार आणि संबंधित घटकांच्या कल्याणासाठी ही लढाई जिंकल्या शिवाय मी रहाणार नाही. अशी प्रतिक्रिया शेतकरी सभासद चंद्रकांत सावंत यांनी दिली आहे.


.jpg)