Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनला सातव्यांदा विजेतेपद

केएसए गडहिंग्लज फुटबॉल लीग


संयुक्त भिमनगर फुटबॉल क्लब उपविजेता


गडहिंग्लज :  केएसए लीग विजेत्या गडहिंग्लज युनायटेड 'अ' संघाला करंडक देताना विश्वास कांबळे. सोबत अर्जून चौगूले, संभाजी मांगोरे पाटील, दिपक घोडके, आणाप्पा गाडवी, दिपक कुपन्नावर आदी. (आशपाक किल्लेदार)



गडहिंग्लज (प्रतिनिधी) : अपेक्षेप्रमाणे शेवटच्या सामन्यात गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन 'अ' संघाने काळभैरी रोड फुटबॉल क्लबचा (केबीआर) २-० असा सहज पाडाव करून सर्वाधिक १२ गुणासह विजेतेपद आणि प्रतिष्ठेचा केएसए करडंक मिळविला. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिशनचे हे सातवे विजेतेपद ठरले. नऊ गुणासह संयुक्त भिमनगर फुटबॉल क्लबला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनमार्फत (केएसए) शिवराज महाविद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा सुरु होती. गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनने स्पर्धेचे संयोजन केले होते.



या स्पर्धेत यापुर्वीचे तीनही सामने जिंकून गडहिंग्लज युनायटेड 'अ' संघाने  विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले होते. आजच्या सामन्याची केवळ औपचारिकता शिल्लक होती. यात युनायटेड अ संघाने केबीआरला दोन गोलने हरवून विजेतेपद कायम राखले. पुवार्धात आघाडीपटू  सत्यम पाटील तर उत्तरार्धात मध्यरक्षक प्रसाद पोवारने उत्कृष्ट गोल करून विजयाचे शिल्पकार ठरले. दुसऱ्या रंगतदार सामन्यात आकाश चव्हाणच्या गोलच्या जोरावर सॉकर ट्रेनिंग सेंटरने गडहिंग्लज युनायटेड 'ब' संघाचा पराजय करून स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला. उत्तरार्धात युनायटेड 'ब' संघाचे गोल फेडण्याचे प्रयत्न समन्वया अभावी फोल ठऱले.



सामन्यानंतर कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनचे फुटबॉल समिती सदस्य प्रशिक्षक  विश्वास कांबळे, संभाजी मांगोरे- पाटील, स्पर्धा प्रमुख दिपक घोडके यांच्या हस्ते विजेते आणि उपविजेत्यांचा करडंक देऊन सत्कार करण्यात आला. स्पर्धा समन्वयक दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात स्पर्धेचा आढावा घेतला.  यावेळी जेष्ठ खेळाडू अर्जून चौगुले, आणाप्पा गाडवी, किरण कावणेकर उपस्थित होते. विजेत्या आणि उपविजेत्या संघातील खेळाडूंनी जल्लोष करून मैदान दणाणून सोडले. या यशामुळे  विजेत्या गडहिंग्लज युनायटेड  आणि उपविजेत्या संयुक्त भिमनगरला कोल्हापूरात केएसएच्या  वरिष्ठ गटाच्या बाद पध्दतीच्या फुटबॉल  स्पर्धांत थेट प्रवेश मिळाला आहे.


विजेता संघ असा


महेश सुतार (कर्णधार) सुल्तान शेख, अमर गवळी, रोहित साळोखे, यश खोत, कुलदिप चव्हाण, प्रसाद पवार, सौरभ मोहिते, अभिषेक कोरवी,सिध्दार्थ दड्डीकर, सत्यम पाटील, आर्यन दळवी, विद्याधर धबाले, अवधूत चव्हाण, नुमान मुल्ला, वाहिद मकानदार.





Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.