Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जीवनात ध्येय गाठण्यासाठी चांगल्या विचारांची संगत महत्वाची : कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर

गडहिंग्लजला 'शिवराज'मध्ये वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त पारितोषिक वितरण समारंभ संपन्न


                                           छायाचित्र : अशपाक किल्लेदार 

गडहिंग्लज (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. आपले ध्येय गाठण्यासाठी पैशांची संगत लागत नाही तर चांगल्या विचारांची संगत महत्वाची आहे. जीवनात कष्ट आणि प्रयत्न करीत असताना अनेक अडथळे येत असतात. त्याला धैर्याने सामोरे जाऊन आपल्या कृतीशील प्रयत्नाला प्राधान्य दिले पाहिजे. शिवाय आपल्या ज्ञानक्षमतेच्या जोरावर यशस्वी झाले पाहिजे असे प्रतिपादन एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबईचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले.


गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून के.डी.सी.सी.बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, तर डॉ.नरेंद्र पाटील, शिवाजीराव खोत, शीलाताई जाधव, शशिकांत रणनवरे वडरगेच्या सरपंच सविता पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते.


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी स्वागत करून अहवाल वाचनातून महाविद्यालयाच्या यशाचा आढावा घेतला. नॅक समन्वयक प्रा. किशोर आदाटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.विलास नांदवडेकर पुढे म्हणाले, खरेतर त्याकाळी शिक्षणातून घडण्याची संधी आम्हाला शिवराज महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली म्हणून आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थी खऱ्याअर्थी घडलो. त्यावेळच्या गुरुवर्यांनी आम्हाला मौलिक असे ज्ञान दिले म्हणून आम्ही आमच्या जीवनात यशस्वी झालो आहोत. शिवराज महाविद्यालयाने आम्हा गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानाने श्रीमंत केले म्हणूनच आम्ही यशाची उंची गाठण्यात यशस्वी झालो असल्याचे डॉ. नांदवडेकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी यु.जी.सी.च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होत आहे. यामध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे. आजच्या शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले. आज स्मार्टफोनचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा वापर रिसर्च व नवनवीन कल्पना मांडण्यासाठी उपयोग करून घ्यावा. शिवाय वापरही मर्यादित स्वरुपाचा असावा असेही डॉ. विलास नांदवडेकर यांनी स्पष्ट केले.


यावेळी विशेष अतिथी के.डी.सी.सी.बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनीही स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात सातत्य टिकवून जीवनात यशस्वी होणे आवश्यक आहे. शिवराज महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाची सलग बारा वर्षे जनरल चँपियनशिप पटकावून खेळातून निर्माण केलेला दबदबा खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले व पारितोषिकप्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सचिव डॉ.अनिलराव कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय स्वॅन्शी विद्यापीठातून रेडीयशन विषयातून पदवी प्राप्त केल्याबद्दल माजी विद्यार्थिनी विशाखा कुराडे, दिल्ली येथील लावणी स्पर्धेत निवड झालेली विद्यार्थिनी सानिका सावरे, आंतरविद्यापीठ शास्त्रीय संगीत गायन स्पर्धेत सुवर्णपदक विजेता अर्णव बुवा, शिवाजी विद्यापीठाच्या एम.कॉम.परीक्षेतमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त प्रथमेश कोले व निकिता माने, मयुरी पाटील, सोनाली मटकर यांचा कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांच्या हस्ते विशेष गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते ‘गुणी शिवराजीयन’ म्हणून श्रेयश संभाजी शिवूडकर बी.एस्सी.भाग तीन (फिजिक्स), कु. रिर्द्धी प्रसाद डवरी बी.कॉम.भाग तीन यांना गौरविण्यात आले. यावेळी  वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमातील पुस्तक परीक्षण, आदर्श वाचक तसेच महाविद्यालयाच्या विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.



   

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष के.जी.पाटील, संचालक बसवराज आजरी, एम.के.सुतार, प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, नारायणराव कुराडे, प्रा.विश्वजित कुराडे, टी.एस.देसाई, अरुण माने, यांच्यासह संस्थेचे अन्य मान्यवर, फार्मसीचे प्राचार्य डॉ.राहुल जाधव, पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, स्नेहसंमेलन प्रमुख के.टी.कुंभार, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिष्ट्रार डॉ.संतोष शहापूरकर, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.श्रद्धा पाटील, प्रा.बियामा वाटंगी, प्रा.प्रियांका जाधव, डॉ.विद्या देशमुख यांनी केले. डॉ.अशोक मोरमारे, प्रा.शरद पाटील, प्रा.गौरव पाटील, प्रा.ए.आर.कांबळे, प्रा.विशांत दानवडे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. प्रा.गौरव पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.


सकाळच्या सत्रात स्नेह्संमेलनानिमित्त आयोजित शिवायन भित्तीपत्रक, ग्रंथ-प्रदर्शन, पाककला, मेहंदी, पुष्परचना, चित्रकला, रांगोळी, फनी गेम्स व फूड फेस्टिवलचे उदघाटन विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

             

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.