छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध
सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे ज्येष्ठ चित्रपट अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गडहिंग्लज येथील शिवप्रेमींनी आंदोलन करत निषेध नोंदविला.
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आग्र्यातील सुटकेबाबत वादग्रस्त विधान केले आहे. "छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून सुटण्यासाठी पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या अनेक सरदारांना लाच देऊन आग्र्याहून सुटून महाराष्ट्रात परतले" असे वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकर यांनी केले आहे. यामुळे राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज येथील शिवप्रेमींच्या वतीने दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख दिलीप माने, युवासेना जिल्हा अधिकारी अवधूत पाटील, शहर प्रमुख प्रकाश रावळ, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, मनीष हावळ, शरचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अमर चव्हाण, शिवप्रसाद तेली, उदयराव जोशी, काँग्रेसचे विद्याधर गुरबे, विनायक उर्फ अप्पी पाटील, प्रशांत देसाई, भाजपा अभियंता सेलचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत तसेच सुधीर शिवणे, संजय पाटील यांच्यासह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोलापूरकर यांच्या प्रतिमेचे दहन, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
दरम्यान, उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रा. आशपाक मकानदार, प्रकाश कांबळे, महेश आरभावी, प्रा. प्रकाश भोईटे, महावीर दसुरकर, प्रा. सुभाष कोरे, साताप्पा कांबळे, प्राध्यापक पुंडलिक रक्ताडे, विठ्ठल भमानगोळ, राजू जमादार, प्राध्यापक विजय काळे, आप्पासाहेब कमलाकर, प्राध्यापक निंगाप्पा गावडे, मौलाना अजीम पटेल, प्राध्यापक पी डी पाटील, अरविंद बारदेसकर, प्राध्यापक योगेश पाटील, बी. एम पोवाडे उपस्थित होते.



