Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापुरातील सतेज चषक फुटबॉल स्पर्धेसाठी गडहिंग्लजच्या संघांना वगळले

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनला निवेदन 


स्पर्धेत सहभागी न केल्याने खेळाडूंमध्ये असंतोष




गडहिंग्लज (प्रतिनिधी) : आजपासून (दिनांक १) कोल्हापुरात सतेज चषक वरिष्ट गटाची फुटबॉल स्पर्धा सुरु होत आहे. या स्पर्धेत गडहिंग्लजच्या दोन्ही संघांना वगळल्याने स्थानिक फुटबॉल वर्तुळात असंतोष व्यक्त होत आहे. याबाबत येथील सर्व स्थानिक संघांनी  कोल्हापूर स्पोटर्स असोसिएशनला निवेदन दिले आहे. वरिष्ठ गटाच्या स्पर्धेत सहभाग मिळणार नसेल तर ग्रामीण लिग स्पर्धा काय कामाची अशी तक्रार संघानी केली आहे.



केएसएने गेल्याच आठवड्यात गडहिंग्लज ग्रामीण फुटबॉल लीग घेतली. यात गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि संयुक्त भिमनगर फुटबॉल क्लबनी पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेतील विजेते आणि उपविजेत्याला थेट बाद पध्दतीच्या स्पर्धांत प्रवेश मिळत असल्याने दोन्ही संघांनी तयारी केली होती. प्रत्यक्षात काल (दिनांक २७) सतेज चषक स्पर्धेच्या लॉटसमध्ये दोन्ही संघांना वगळल्याने संघात नाराजी पसरली. तातडीने केएसएशी संपर्क साधला असता त्यांनी संयोजकाकडे बोट दाखवत अंग झटकल्याने संघाचा असंतोष वाढला. केएसएची जबाबदारी असताना संयोजकाकडे चेंडू ढकलल्याने  याबाबत सयुंक्त भिमनगर, काळभैरी फुटबॉल क्लब, सॉकर ट्रेनिंग सेंटर आणि गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन अशा सर्वच संघांनी केएसए अध्यक्ष आणि सचिवांना निवेदन पाठवले आहे.



गेल्या दशकभरापासून स्थानिक संघासाठी केएसएमार्फत गडहिंग्लज ग्रामीण लिग स्पर्धा घेतली जाते. या स्पर्धेला ट्रॉफीशिवाय रोख स्वरूपाचे बक्षिस नसताना केवळ कोल्हापूरात बाद पध्दतीच्या स्पर्धा खेळायला मिळणार म्हणून स्थानिक संघ वर्षभर सराव करतात. किट, बूट आणि खेळाडू नोंदणीसाठी प्रत्येक संघ लाखाहून अधिक रक्कम खर्च करतो. त्यामुळे या लीगच्या विजेत्या आणि उपविजेत्याला कोल्हापूरात संधी मिळणार नसेल तर केएसए गडहिंग्लज लीगला काहींच अर्थ राहणार नाही. निवेदनावर काळभैरी रोडचे अध्यक्ष दयानंद पाटील, सॉकर ट्रेनिंगचे किरण कावणेकर, संयुक्त भिमनगरचे विनोद मुनीव, गडहिंग्लज युनायटेडचे संदिप कांबळे यांच्या सह्या आहेत.  



संघांच्या मानसिकतेवर परिणाम, संघ घटले


स्थानिक संघटनांनी वर्षभर विविध शालेय आणि वयोगटांच्या स्पर्धा घेऊन फुटबॉल वाढवला आहे. त्यामुळेच केएसए लीगसाठी संघाची संख्या डझनाहून अधिक झाली होती. पण, लीगमध्ये यश मिळवूनही संधी न मिळाल्याने निम्मे संघ बंद पडले. त्यामुळेच गतवर्षी संघाच्या मागणीवरून सर्व स्पर्धांत केएसएने कोल्हापूरच्या संयोजकांना गडहिंग्लज संघ सक्तीचे केले होते. पण, यंदा पुन्हा वगळल्याने उर्वरित संघांच्या मानसिकतेवर परिणाम होणार आहे. 



कोल्हापूरात खेळायला मिळणार म्हणून वर्षभर सराव करायचा. पण, गडहिंग्लजच्या संघाना संधी मिळत नसल्याने स्थानिक दोन डझनाहून अधिक खेळाडू कोल्हापूरातील संघातून खेळू लागले आहेत. ही परिस्थिती राहिल्यास उर्वरित संघही बंद होतील.

आकाश देसाई,

फुटबॉल खेळाडू, गडहिंग्लज

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.